वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
11 ऑक्टोबरपासून भारतात होणाऱया फिफाच्या पहिल्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अधिकृत तिकीट विक्रीला प्रारंभ करण्यात आला.
येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर या स्पर्धेच्या तिकीट विक्रीचे अधिकृत उद्घाटन केंद्रीय क्रीडा युवजय खात्याचे मंत्री अनुराग ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाला फिफाचे लिजेंड लिंडसे टारप्ले, भारतीय फुटबॉल संघाचे कर्णधार सुनील छेत्री, आशालता देवी तसेच भारतीय फुटबॉल क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते. फिफाची 17 वर्षाखालील वयोगटातील महिलांची विश्व करंडक स्पर्धा पहिल्यांदाच भारतामध्ये भरविली जात आहे.
देशातील फुटबॉल शौकिनांना ही स्पर्धा पर्वणीच ठरणार आहे. या स्पर्धेतील सामने भुवनेश्वर, गोवा आणि नवी मुंबई येथे खेळविले जातील. या स्पर्धेसाठी इच्छुक शौकिनांना तिकीट आरक्षणासाठी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर स्पर्धा 11 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. ही स्पर्धा भारतात भरविली जात असल्याने भारतीय फुटबॉल क्षेत्राला अधिक चालना मिळेल, असे क्रीडा युवजन मंत्री अनुराग ठाकुर यांनी म्हटले आहे.









