माजगाव/प्रतिनिधी
जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या माजगाव पैकी माळवाडी (ता.पन्हाळा) येथील सुधीर अशोक गुजर (वय २७) या युवकाचा तुटलेल्या तारेचा स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. याची नोंद पन्हाळा पोलिसांत झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सुधीर दरा नावाच्या गुजर झाडी या शेतात जनावरांना वैरण आणण्यासाठी गेला होता. यावेळी उसात तुटून पडलेल्या वीज तारेचा त्याच्या हाताला स्पर्श झाला. प्रवाहित वीज तारेचा जोरदार धक्का बसून सुधीरचा जागीच मृत्यू झाला. थोड्या वेळाने मुलगा कुठे आला नाही हे पाहण्यासाठी सुधीरचे वडील अशोक हे शेतात गेले असता सुधीर मृत अवस्थेत पडल्याचे दिसले. त्यांच्या ओरडण्याने आजूबाजूचे शेतकरी गोळा झाले. यावेळी पन्हाळा पोलीस, महावितरणचे अधिकारी व पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा झाला. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सुधीर एकुलता एक होता. त्याच्या मागे आईवडील ,पत्नी आजी आजोबा असा परिवार आहे. गेल्या वर्षीच सुधीरचे लग्न झाले आहे. तो आसपासच्या गावात कृषी पंपाच्या इलेक्ट्रिक मोटारीची कामं करत होता. यामुळे तो सर्वत्र परिचित होता. गुजर कुटुंबाचा आधारवड व होतकरू मनमिळावू सुधीरचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त व्यक्त होत आहे.
तीन दिवसांपूर्वीच या भागातील विहिरीचा कृषी पपांचा वीज पुरवठा महावितरणने सुरु केला होता. वीज पुरवठा सुरु करण्यापुर्वी महावितरणने योग्य ती पडताळणी न करताच वीज पुरवठा कसा काय सुरू केला ? असा प्रश्न ग्रामस्थामधून केला जात आहे.









