राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; 2017 च्या प्रभाग रचनेनुसार मतदान प्रक्रिया राबविण्याचे निर्देश; आठवडय़ाभरात नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
कोल्हापूर प्रतिनिधी
जिह्यातील 25 जिल्हा परिषदा आणि आणि त्याअंतर्गत 284 पंचायत समितींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत. नवीन प्रभाग रचना, आरक्षण प्रक्रिया, मतदार यादीसह सर्व कार्यक्रम रद्द करावा असे आदेश निवडणूक आयोगाच्या सचिवांनी जिह्याधिकाऱयांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. येत्या आठवडय़ाभरात नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून नोव्हेंबरच्या पुर्वांधात निवडणूका होण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा- जिल्हा परिषदेच्या ‘आरोग्य’ विभागात लाचखोरीचा ‘कळस’
शिंदे-फडणवीस सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 2017 पूर्वीच्या प्रभाग रचनेनुसार होतील असा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात वाढ केली होती. आता 2017 च्या प्रभागरचनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने सध्याची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी नव्याने आरक्षण सोडत निघेल. शिवाय मतदारसंघांची संख्या व रचना 2017 प्रमाणे राहील हे स्पष्ट झाले आहे.