बंधारा फुटला, अनेक पुल पाण्याखाली
सावळज/वार्ताहर
सावळजसह परीसरात गुरूवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने अतिवृष्टी झाली. या जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरले, तर अग्रणी नदीला पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत, तर बंधारा फुटला असून शेतातील माती वाहून गेली आहे. दरम्यान, केवळ चार तासात तब्बल ८० मिलिमीटर पाऊस कोसळल्याने अनेक भागात नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास सावळजसह परीसरात जोरदार पाऊसाने सुरूवात केली. हळूहळू पावसाचा जोर वाढल्याने ढगफुटी सदृश्य पाऊस पडू लागला. या जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात व दुकानात पाणी शिरले. त्यामुळे साहित्याचे मोठे नुकसान झाले. येथील डवरी समाज वस्तीमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले. तर अनेक घरात फुट-दीड फूट पाणी होते.
सावळजसह परीसरात अतिवृष्टी; ४ तासात ८०मिमी. पावसाची नोंदअतिवृष्टीमुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीला पूरस्थिती निर्माण झाली त्यामुळे सिद्धेवाडी-यल्लमा पूल, सावळज-जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल तर गव्हाण- मनेराजुरी मार्गावरील पूल पाण्याखाली गेले. तर बसवेश्वरनगर येथील मौल्याच्या टेकाचा बंधारा फुटला. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे या बंधाऱ्याशेजारील मातीचा भराव व बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला. तसेच शेतात पाणी शिरून शेतातील माती वाहून गेली. हा बंधारा दुसऱ्यांदा फुटला आहे. सिध्देवाडी तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सांडव्यावरून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
हे ही वाचा : तासगावात जुन्या वादातून एकाचा खून