21 पोलीस जखमी-वाहनांची नासधूस प्रकरणाचा निकाल
प्रतिनिधी / बेळगाव
दिवाळी सणामधील लक्ष्मी पूजन असताना चव्हाट गल्ली येथे मित्राला भेटण्यासाठी आलेल्या मुस्लीम युवकाला जाब विचारण्यात आला. ‘वारंवार आमच्या गल्लीमध्ये का येतोस?’ म्हणून त्याला मारबडव केली. त्यानंतर मुस्लीम युवक चव्हाट गल्ली येथील त्या युवकांना जाब विचारण्यासाठी आले असता दोन गटांमध्ये मारामारी झाली. ही माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. दोन्ही बाजूने दगडफेक झाल्यामुळे 21 पोलीस तसेच वाहनांची मोडतोड पेली होती. याप्रकरणी 31 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्या खटल्याची सुनावणी होऊन सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणातील संशयित आरोपी सचिन गर्डे (रा. कामत गल्ली), आरिफ कोतवाल (रा. दरबार गल्ली), मैनुद्दीन खानापुरे (रा. कोतवाल गल्ली), फईम मेस्त्राr (रा. जालगार गल्ली), फईम कोतवाल (रा. दरबार गल्ली), महम्मदशफी ताशिलदार (रा. खंजर गल्ली), इनायत निजामी (रा. शिवाजीनगर), नासीम खानापुरे (रा. श्रीनगर), सूरज भोसले, संतोष अनगोळकर, किशोर सायने, निलेश खांडेकर (सर्व रा. चव्हाट गल्ली), सूरज धमुने (रा. ढोर गल्ली), अनिस बडकली (रा. टोपी गल्ली), सूरज सुतार (रा. भोवी गल्ली), भूषण निर्मळकर (रा. ताशिलदार गल्ली), राघवेंद्र येळ्ळूरकर (रा. मुजावर गल्ली), सचिन कोलेकर (रा. शाहूनगर), पेरमळ जालगार, विजय जालगार (दोघेही रा. कपिलेश्वर मंदिर पाठीमागे), धनंजय जाधव (रा. होनीहाळ), संतोष अक्कतंगेरहाळ (रा. बसवण गल्ली), रमाकांत कोंडुसकर (रा. गांधीनगर), अप्पाजी पार्वती, सुरेश यरझरवी (दोघेही रा. सुळेभावी), प्रशांत नायक (रा. अनगोळ), किरण जाधव (रा. रामनगर), विनायक रेडेकर, मारुती शहापूरकर, मोहन पाटील (तिघेही रा. गांधीनगर), गणपती होसमनी (रा. होसमनी) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.
6 नोव्हेंबर 2010 रोजी ही घटना घडली होती. टोपी गल्ली, चव्हाट गल्ली, नाना पाटील चौक परिसरात दगडफेक झाली होती. याची माहिती तत्कालीन पोलीस निरीक्षक रामनगौडा हट्टी, उपनिरीक्षक चन्नकेशव टिंगरीकर यांना मिळताच ते घटनास्थळी पोलीस फौजफाटय़ासह दाखल झाले. यावेळी रामनगौडा हट्टी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती तर टिंगरीकर यांच्या डोक्मयाला जबर मार बसला होता. 19 पोलीस अधिकारीही जखमी झाले होते.
त्यानंतर मार्केट पोलीस स्थानकात गुन्हे दाखल केले होते. केपीडीपी
ऍक्टही दाखल केला होता. त्या ठिकाणी 25 साक्षीदार तपासण्यात आले. मात्र साक्षीदारातील विसंगतीमुळे 31 जणांची निर्दोष मुक्तता झाली. या सर्वांतर्फे ऍड. प्रताप यादव, ऍड. एल. के. गुरव, ऍड. एस. व्ही. मुतगेकर यांनी काम पाहिले.









