सोमवारपर्यंत मंत्रीमंडळ झाले नाही तर मोर्चा काढावा लागेल
ऑनलाईन टीम/ तरुण भारत
राज्यातेल सत्ता बदलामुळे काही जणांना ‘गोकुळ’मध्येही सत्तांतर होईल हा भ्रम आहे, असा टोला आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांना शुक्रवारी प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना लगावला. तसेच सध्याचे सरकार हे जनतेच्या मनातील सरकार नसून सोमवार (दि.8)पर्यंत मंत्रीमंडळ झाले नाही तर मोर्चा काढावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात ते प्रसिध्दीमाध्यमांशी बोलत होते.
आ. पाटील म्हणाले, राज्यातील सत्तांतराचा जिह्यातील सहकारावर कोणताही परिणाम होणार नाही. कोल्हापुरातील जनता एका प्रवृत्तीच्या विरोधात असल्याने ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाले. सत्ता बदल झाल्यामुळे कदाचित काही जणांना असें वाटत असेल. परंतु सत्ता असो किंवा नसो आम्ही कायम जनतेत असतो.
ते पुढे पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत 2011 पासून जनगनना झाली नाही. त्यामुळे काही तर्कशास्त्र लावून महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे मतदार संघ वाढवले होते. परंतु या सरकारने ही प्रभागरचनाच रद्द केली. काहीतरी करुन निवडणुका पुढे ढकलायचा हा हेतू या सरकारचा आहे.
राजर्षी शाहू समाधीस्थळाचा निधी रोखणे योग्य नाही.
आ. पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी दिलेला निधी रोखणे योग्य नाही. याबाबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटले आहे. लोकशाही संपवायचं धोरण भाजपचे असल्याने आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.
हे ही वाचा : देशात चार लोकांची हुकूमशाही; राहुल गांधींचा भाजपवर घणाघात









