जांबोटीतील अंगणवाडीत कानडीकरण : शंभर टक्के मराठी भाषिक गावांतील अंगणवाडय़ांतून कन्नडसक्ती
प्रतिनिधी /खानापूर
कर्नाटक शासनाचे सीमाभागात मराठी भाषा, मराठी संस्कृती संपविण्याचे कुटिल कारस्थान वेगाने सुरू आहे. अंगणवाडीपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत कन्नडसक्तीच्या वरवंटय़ाखाली विद्यार्थी भरडले जात आहेत. शासनाने पद्धतशीरपणे मराठी भाषा संपविण्याचा डाव सुरू केला असून त्याचा प्रत्यय अंगणवाडीतून येत आहे. नवीन अंगणवाडय़ा बांधण्यात येत आहेत. या सर्व अंगणवाडय़ातून संपूर्ण शिक्षण कानडीतून देण्याचा हट्टाहास कर्नाटक सरकारने सुरू केला आहे.
जांबोटी येथे नुकताच उद्घाटन झालेल्या अंगणवाडीत याचे खरेरुप दिसून आले. संपूर्ण अंगणवाडीच्या भिंती कन्नड अक्षरांनी, अंक आणि बाराखडी यासह इतर शैक्षणिक तक्त्यांनी रंगविण्यात आल्या आहेत. तसेच साहित्यही कन्नडमध्ये पुरविण्यात आलेले आहे. यामुळे शंभर टक्के मराठी भाषिक असलेल्या गावातून आता कानडीकरणाचा वरवंटा फिरविला जात आहे. बालपणीच ज्यांच्या मनावर आई या मराठी शब्दाने संस्कार घडविले जातील मायबोलीचे बाळकडू पाजवले जाईल त्याच वयात कानडीकरणाचा वरवंटा या बालमनावर फिरविल्याने मराठी भाषिक असलेली बालके निश्चितच कन्नड भाषा अवगत करतील आणि मराठी भाषा विसरून जातील. संत साहित्याची दैदीप्यमान परंपरा असलेली मराठी भाषाच संपविण्याचा घाट बालकांच्या बालवयातच त्यांच्या मनावर कन्नड भाषा रुजविण्याचे कुटिल कारस्थान कर्नाटक सरकार करत आहे. यासाठी तालुक्मयातील मराठी भाषिक जनतेने महाराष्ट्र एकीकरण समितीने आता आवाज उठविणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या एक-दोन वर्षात सीमाभागातील मराठी भाषा, मराठी संस्कृती निश्चितच संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही. नुकताच जांबोटी-वडगाव येते अंगणवाडीचे उद्घाटन आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी सर्व कार्यक्रम व भाषणे मराठीत झाली. मात्र अंगणवाडीत पूर्णपणे कानडीकरण करण्यात आले आहे.
याबाबत जांबोटी येथील जि. पं. सदस्य जयराम देसाई यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले कर्नाटक सरकारचा मराठी भाषेच्या मुळातच हात घालण्याचा हा प्रकार आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती संपविण्याचे हे एक कुटिल कारस्थान आहे. जर या पद्धतीने सर्व अंगणवाडय़ा कानडीकरण करण्यात आल्या तर निश्चितच मातृभाषा संपुष्टात येणार आहे. यासाठी तालुक्मयातील मराठी गावातून या अंगणवाडय़ांचे परत मराठीकरण करून घेण्यासाठी वाटेल तो लढा देण्यास आम्ही तयार राहिले पाहिजे, यासाठी म. ए. समितीच्या माध्यमातून आता शिघ्रतेने लढा उभारणे गरजेचे आहे. अन्यथा मराठी बहुल गावांमध्ये येत्या काही दिवसात मराठी भाषा संपण्यास वेळ लागणार नाही अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.









