कायमस्वरुपी नेमणुकीची आग्रहाची मागणी : तालुका भाजप शिष्टमंडळाचा अधिकाऱयांना घेराव : कर्मचारी कमिशन मागत असल्याचा आरोप
वार्ताहर /खानापूर
खानापूर तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारीपदाची जागा गेल्या पाच महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे तालुका पंचायतीचा कारभार बेभरवशाचा झाला आहे. पाच महिन्यांपासून कायमस्वरुपी कार्यनिर्वाहक अधिकारी नसल्याने प्रभारी अधिकारी काम पाहत आहेत. पण त्यांचेही याकडे लक्ष नसल्याने तालुका पंचायत कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले आहे. यासाठी तातडीने खानापूर ता. पं.वर कायमस्वरुपी कार्यनिर्वाहक अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी करत तालुका भाजप शिष्टमंडळाने मंगळवारी ता.पं.मध्ये जि. पं. उपकार्यदर्शी भीमाप्पा लाडे यांना घेराव घालून जाब विचारला. तालुका पंचायतीचा कारभार सुरळीत करण्याची मागणी केली.
तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी प्रकाश हालमन्नावर यांची दांडेली येथे बदली झाल्यानंतर पाच महिन्यांपासून सदर जागा रिक्त आहे. या जागेवर बेळगाव ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी राजेश धनवाडकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु धनवाडकर हे वारंवार गैरहजर असतात. त्यामुळे येथील तालुका पंचायतीच्या कामकाजात सुरळीतपणा नाही. ता. पं. समितीने मंजूर दोन कोटी अनुदानातून केलेल्या कामांची बिले देण्यासही ताटकळत ठेवण्यात आले आहे, याचाही जाब यावेळी अधिकाऱयांना विचारण्यात आला.
अम्मणगी भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू असल्याचा आरोप
ता. पं. मार्फत दोन कोटीच्या अनुदानातून तालुक्मयात विकासकामे राबविण्यात आली आहेत. सदर कामाची बिले बिलिंग विभागाचे कर्मचारी अम्मणगी प्रत्येक बिलामागे 10 टक्के कमिशन मागत असल्याचा थेट आरोप कृष्णा कुंभार यांनी जिल्हा पंचायत उपकार्यदर्शी भीमाप्प्पा लाडे यांच्याकडे केला. भाजपा शिष्टमंडळानेही उपकार्यदर्शी व तालुका पंचायत प्रभारी अधिकाऱयांना धारेवर धरून त्याची तात्काळ चौकशी करण्यात यावी व मंजूर झालेल्या दोन कोटी निधीपैकी उर्वरित बिलाची लवकरच पूर्तता करावी, अशी सूचना अधिकाऱयांना केली.
भाजप पदाधिकाऱयांकडून अधिकारी धारेवर
स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत 15 व्या वित्त आयोगातून कचरावाहू गाडी तसेच कचरा निर्मूलनसाठी ग्राम पंचायत पातळीवर शेड निर्माण करण्यात आले आहे. यासाठी 20 लाखाचा निधी 15 व्या वित्त आयोगातून खर्च करण्यात आला आहे. हा निधी केंद्र सरकारकडून थेट पंचायतीच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. या कचरावाहू गाडय़ा तालुका पंचायतीमधून वितरण करण्याची गरजच काय, तसेच यात आमदार अथवा खासदारांचा निधी नसताना श्रेय लाटण्याचा प्रकार आहे. याबद्दलही अधिकाऱयांना भाजप पदाधिकाऱयांनी धारेवर धरले.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, भाजपा अध्यक्ष संजय कुबल, सुरेश देसाई, बाबुराव देसाई, तालुका पंचायत सदस्य श्रीकांत इटगी, बसवराज सानिकोप, सुनील मड्डीमनी, गुंडू तोपिनकट्टी, नारायण पाटील, शंकर बस्तवाडकर, शिवा मयेकर, आकाश अथणीकर, लक्ष्मण बामणे, किरण यळ्ळूरकर आदी उपस्थित होते.









