आरोग्यमंत्र्यांनी संसदेत दिली माहिती ः सध्या देशात 8 रुग्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याणमंत्री मनसुख मांडविया यांनी भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे 8 रुग्ण सापडले असून हा आजार फैलावण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे मंगळवारी म्हटले आहे. मंकीपॉक्सबद्दल भीती बाळगण्याची गरज नाही, कारण हा आजार कोरोनाप्रमाणे वेगाने फैलावत नाही. तर अत्यंत नजीकचा संपर्क झाला तरच हे संक्रमण फैलावत असल्याचे मांडविया यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पूरक प्रश्नांच्या उत्तरादाखल सांगितले आहे.
मंकीपॉक्सच्या संक्रमणाच्या तपासणीसाठी देशात 15 संस्थांची निवड करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास यात अधिक संस्थांना देखील सामील केले जाऊ शकते. मंकीपॉक्सचे संक्रमण हे वैज्ञानिक जगतासाठी नवे नाही. 1970 मध्ये आफ्रिकेपासून जगातील काही अन्य देशांमध्ये हे संक्रमण दिसून आले होते. सद्यकाळात याचे रुग्ण सापडू लागल्यावर जागतिक आरोग्य संघटनेने यावर विशेष लक्ष दिले असल्याचे मांडविया म्हणाले.
अत्यंत नजीकच्या संपर्कात येताच हे संक्रमण फैलावते, आईपासून मुलांमध्ये आणि पतीपासून पत्नीत किंवा पत्नीपासून पतीमध्ये हे संक्रमण फैलावू शकते. कोरोना महामारीच्या अनुभवांपासून धडा घेत सरकारने मंकीपॉक्स संक्रमणाला हाताळण्याची तयारी सुरू केली होती. भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण 14 जुलै रोजी आढळला होता, आताच्या घडीला रुग्णसंख्या 8 वर पोहोचली आहे. यातील 5 रुग्ण हे विदेशातून भारतात आलेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
कुठल्याही आजाराला कमी लेखू नये, परंतु मंकीपॉक्सची भीती बाळगण्याची गरज नाही. मंकीपॉक्सपासून अधिक धोका नाही. काही प्रमाणात सतर्क राहिल्यास आम्ही या संक्रमणाच्या फैलावाला नियंत्रित करू शकतो असे ते म्हणाले.
कार्यगटाची स्थापना
संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी नीति आयोगाने एका कार्यगटाची स्थापना केली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिशानिर्देश जारी केले आहेत. मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून येणाऱया ठिकाणी केंद्रीय पथके पाठविण्यात येत असून ती राज्यांना सहकार्य करत असल्याचे मांडविया यांनी सांगितले आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या प्रयत्नांमुळे यावरील लस लवकरच विकसित करता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.









