आमदार चंद्रशेखर बावनकुळे : राज्यातील 16 मतदारसंघात नियोजन: नऊ केंद्रीय मंत्र्यांचे पथक कोल्हापुरात येणार
कोल्हापूर प्रतिनिधी
2024 लोकसभेसाठी भाजपचे 400 पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघात तयारी करण्यासाठी येत्या महिन्याभरात 9 केंद्रीय मंत्र्यांचे पथक येत आहे. कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात हे पथक लवकरच दाखल होणार आहे, अशी माहिती माजी मंत्री, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाने लोकसभेची तयारी सुरू केली आहे. राज्यातील नियोजन कसे असणार, याची माहिती देण्यासाठी आमदार बावनकुळे सोमवारी कोल्हापूर दौऱयावर आले होते. यावेळी त्यांनी सर्कीट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
केंद्रीय मंत्री अजयकुमार यांच्या नेतृत्वाखाली 9 केंद्रीय मंत्र्यांचे पथक या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये राज्याच्या दौऱयावर येत आहे. सलग 18 महिने हे पथक सहावेळा मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधून, जनतेच्या समस्या, केंद्रीय शासकीय योजना, आर्थिक दुर्बल घटकांचे प्रश्न आदींची माहिती घेणार आहे. यासाठी 21 कलमी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. प्रत्येक मतदारसंघात तीन दिवस या पथकाचा मुक्काम असणार आहे. महामार्ग, पूल व इतर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन याचा अहवाल पाठवणार आहे. शेवटच्या दिवशी याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याच्या विकासासाठी काय करता येईल, याची माहिती घेण्यासाठी दिल्लीसाठी जात आहेत. 32 दिवसात त्यांनी राज्यासाठी 32 महत्वाचे निर्णय घेतले आहेत. महागाई व जीएसटी याची झळ जनतेला बसणार नाही याचा प्रयत्न सुरू आहे. पक्ष वाढवण्याचा अधिकार नडडा यांनाच आहे. भाजपने अनेक प्रादेशिक पक्षांना जीवदान दिले आहे. ओबीसी आरक्षणासाठी महाविकास आघाडीने कोणताच प्रयत्न केला नाही, उलट उपमुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 दिवसात ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला.पत्रकार परिषदेस माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, महेश जाधव, भगवान काटे, अशोक देसाई, सत्याजित देशमुख, राहुल देसाई आदी उपस्थित होते.