प्रतिनिधी /वास्को
वास्कोतील श्री दामोदर भजनी सप्ताहानिमित्त यंदा दुसऱया वर्षी वास्को रोटरॅक्ट क्लब व सम्राट क्लब यांच्यातर्फे वास्को शहरातील 1930 प्रकल्पातील हॉलमध्ये श्री दामोदर भजनी सप्ताहावर आधारीत 5 बाय 5 आकाराची भव्य रांगोळी रेखाटण्यात आली आहे. प्रसिध्द रांगोळी कलाकार आकाश नाईक यांनी त्यांच्या साहाय्यक कलाकारांच्या मदतीने ही रांगोळी साकारलेली असून गुरूवारपर्यंत ही रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली असेल. ‘अवघा रंग एकची झाला’ असे शिर्षक या प्रदर्शनाला देण्यात आले आहे.
रविवारी संध्याकाळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या हस्ते या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वास्को सम्राट क्लबचे अध्यक्ष जयराम पेडणेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अक्षदा बांदेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी वास्को रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्ष प्रियंका पंडित, प्रकल्प व्यवस्थापक रोहन बांदेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
दामोदर भजनी सप्ताहानिमित्त आकाश नाईक यांनी यंदा दुसऱयांदा भजनी सप्ताहावर आधारीत रांगोळी साकारली आहे. या रांगोळीत श्री देव दामोदर, समई, भजनाचा प्रारंभ, दिंडी, बाल दामोदर भक्त, समाप्तीत श्रीफळ समुद्राला अर्पण करताना, खाजेकार, फुलकार, मुरगाव बंदर व रेल्वे अशा कलाकृतींचा समावेश आहे. रोहन बांदेकर यांनी रांगोळीचा उद्देश कथन करून या रांगोळी विषयी विस्तूत माहिती दिली. प्रारंभी देवेंद्र शिरोडकर यांनी भक्तीगीत सादर केले. त्यांना नारायण मांद्रेकर व शेखर मांद्रेकर हार्मोनियम व तबल्यावर साथ केली. यावेळी रांगोळी कलाकार आकश नाईक व त्यांच्या सहकाऱयांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
डॉ. शिवानंद बांदेकर यांनी यावेळी बोलताना रांगोळी ही एक भारतीय परंपरा व सर्जनशील कला असून ती अशीच टिकवून ठेवायला हवी. तीला अन्यन साधारण महत्व आहे. रांगोळी कलेला वैद्यकीयदृष्टय़ाही महत्व आहे. या कलेचे महत्व युवकांपर्यंत पाहोचवायला हवे असे ते म्हणाले. या उपक्रमाबद्दल त्यांनी रॉटरॅक्ट क्बल व सम्राट क्लबचे अभिनंदन केले.








