प्रतिनिधी /वास्को
वास्को शहरातील मुरगाव पालिकेची धोकादायक ठरलेली जनता बिल्डिंग पादचारी व वाहनांसाठी धोकादायक ठरलेली असताना या इमारतीखाली वास्को सप्ताहातील फेरी भरलेली असून ही फेरी या फुटपाथवरून त्वरीत हटवण्याची आवश्यकता आहे. ही इमारत धोकादायक ठरल्याने मुरगाव पालिकेने या ठिकाणी कडे करून पादचाऱयांना मागच्या काही वर्षांपासून अटकाव केलेला आहे. मात्र त्याच ठिकाणी फेरीचा गाळा थाटण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वास्को शहरातील स्वतंत्रपथ मार्गावरील ही इमारत पालिकेच्या अनेक जीर्ण इमारतींपैकी एक असून या इमारतीची देखरेख न झाल्याने ती कोसळण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी या इमारतीच्या तळमजल्यावर बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा होती. इमारत धोक्यात आल्याने बँकेनेही दोन वर्षांपूर्वी दुसऱया ठिकाणी स्थलांतर केलेले आहे. सध्या या इमारतीत कोणीच राहात नाही. ती आता वाटसरूंसाठी आयती उपलब्ध झालेली असून तीत गलिच्छता माजलेली आहे. या इमारतीचे काँक्रिट बऱयाच वेळा फुटपाथवर कोसळत असते. ही इमारत कोसळण्याच्या भीतीने इमारतीसमोरील फुटपाथवरून कोणी चालू नये किंवा या इमारतीजवळ कुणी येऊ नये, यासाठी तो फुटपाथचा भाग अडविण्यात आलेला आहे. ही इमारत अचानक कोसळून कुणाच्या जीवावर बेतण्यापूर्वीच ती तोडावी, अशी मागणी लोकांकडून आतापर्यंत होत आलेली आहे. आश्चर्य म्हणजे वास्को शहरात भजनी सप्ताहानिमित्त भरलेल्या फेरीत याच धोकादायक इमारतीखाली गाळा उभारण्यात आलेला आहे. फेरीत या गाळय़ावर लोकांची गर्दी पडणार आहे. त्यामुळे गाळेधारक तसेच लोकांना या इमारतीखाली धोका संभवत असून धोकादायक इमारतीखाली फेरी थाटण्यासाठी पालिकेकडून परवानगी कशी मिळाली. पालिकेने परवानगी दिलेली नसल्यास तो गाळा त्या ठिकाणी कसा उभा राहिला असा प्रश्न जागरूक नागरिकांना पडलेला आहे.









