वृत्तसंस्था/ साउदम्पटन (ब्रिटन)
दक्षिण आफ्रिकेने यजमान इंग्लंड विरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. रविवारी झालेल्या या मालिकेतील शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 90 धावांनी दणदणीत पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या तबरेज शम्सीला सामनावीर तर रेझा हेन्ड्रिक्सला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने 20 षटकात 5 बाद 191 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव 16.4 षटकात 101 धावात आटोपला. द. आफ्रिकेतर्फे रेझा हेन्ड्रिक्स आणि मॅरक्रम यांनी शानदार अर्धशतके झळकविली तर शम्सीने इंग्लंडच्या डावात 24 धावात 5 गडी बाद केले.

द. आफ्रिकेच्या डावामध्ये सलामीचा डि कॉक पहिल्याच षटकातील तिसऱया चेंडूवर खाते उघडण्यापूर्वी त्रिफळाचीत झाला. त्यानंतर हेन्ड्रिक्स आणि रॉसो यांनी दुसऱया गडय़ासाठी 55 धावांची भागीदारी केली. मोईन अलीने रॉसोचा त्रिफळा उडविला. त्याने 18 चेंडूत 6 चौकारांसह 31 धावा जमविल्या. हेन्ड्रिक्स आणि मॅरक्रम या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 87 धावांची भागीदारी केली. जॉर्डनने हेन्ड्रिक्सला बटलरकरवी झेलबाद केले. त्याने 50 चेंडूत 9 चौकारांसह 70 धावा जमविल्या. डेव्हिड मिलरने 9 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 22 धावा जमविताना मॅरक्रमसमवेत चौथ्या गडय़ासाठी 41 धावांची भर घातली. स्टब्जने 2 चौकारांसह 8 धावा जमविल्या. मॅरक्रमने 36 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 51 धावा झळकविल्या. द. आफ्रिकेच्या डावात 1 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे विलीने 25 धावात 3 तर जॉर्डन व मोईन अली यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. हेन्ड्रिक्सचे टी-20 प्रकारातील हे दहावे अर्धशतक आहे.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा डाव 16.4 षटकात 101 धावात आटोपला. इंग्लंडच्या केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. बेअरस्टोने 30 चेंडूत 2 चौकारांसह 27, रॉयने 17, कर्णधार बटलरने 2 चौकारांसह 14 आणि जॉर्डनने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावात 1 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेच्या शम्सीने 24 धावात 5, केशव महाराजने 21 धावात 2 तर नॉर्त्जे, फेहलुक्वायो आणि मॅरक्रम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः द. आफ्रिका 20 षटकात 5 बाद 191 (हेन्ड्रिक्स 70, रॉसो 31, मॅरक्रम नाबाद 51, मिलर 22, विली 3-25, जॉर्डन, मोईन अली प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड 16.4 षटकात सर्वबाद 101 (बेअरस्टो 27, रॉय 17, बटलर 14, जॉर्डन 14, शम्सी 5-24, केशव महाराज 2-21, नॉर्त्जे, फेहलुक्वायो, मॅरक्रम प्रत्येकी 1 बळी).









