अभाविपतर्फे आंदोलन ः मंगळूर घटनेचा निषेध
प्रतिनिधी/ बेळगाव
काही देशविघातक संघटनांकडून देशविरोधी कारवाया करण्यात येत आहेत. यामुळे देशातील शांतता भंग होत असून हिंदुत्ववादी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. हिंदू कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून हे प्रकार थांबवावेत, अन्यथा देशभर उग्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)तर्फे शनिवारी कृष्णदेवराय (कोल्हापूर) सर्कल येथे आंदोलन करीत दिला.
मंगळूर जिल्हय़ातील बेळ्ळारे येथील भाजपचे नेते प्रवीण नेट्टारू यांची काही समाजकंटकांनी हत्या केली. काही महिन्यांपूर्वी शिमोगा येथील हर्षा नावाच्या कार्यकर्त्याचीही हत्या झाली होती. हिंदू कार्यकर्त्यांना समाजकंटकांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. तरीदेखील गृहखाते शांत का? असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. वारंवार होणाऱया हत्या हे गृहखात्याचे व गृहमंत्र्यांचे अपयश असून हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा देऊन प्रवीणच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
काही देशविघातक संघटनांकडून चितावणीखोर वक्मतव्ये केली जात आहेत. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ले होत आहेत. पीएफआय, सीएफआय, एसडीपीआय यासारख्या संघटनांवर कायदेशीर कारवाई करत बंदी घालण्याची मागणी अभाविपने केली. नेहरुनगर येथून कोल्हापूर सर्कलपर्यंत मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर कोल्हापूर सर्कल येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी अभाविपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









