अवैध व्यवहार झाल्याचे तपासात स्पष्ट ः अर्पिताच्या अन्य कंपन्यांच्या बँक खात्यांवरही ईडीकडून नजर
कोलकाता / वृत्तसंस्था
तृणमूल काँग्रेसचे निलंबित नेते पार्थ चटर्जी यांची सहकारी अर्पिता मुखर्जी हिच्याशी संबंधित बँक खात्यांवर शनिवारी मोठी कारवाई केली. अर्पिताच्या वैयक्तिक खात्यांबरोबरच तिच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांची बँक खाती गोठवण्यात आली असून त्यात सुमारे 2 कोटी रुपये सापडल्याचे अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. यापूर्वी 28 जुलै रोजी अर्पिताच्या घरावर छापेमारी करताना ईडीला सुमारे 28 कोटींची रोकड मिळाली होती. तसेच मागील आठवडय़ात 21 कोटी रोख रक्कम सापडली होती.
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळय़ात मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱया ईडीने शनिवारी माजी मंत्री पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्याशी संबंधित आठ कंपन्यांची बँक खाती गोठवली. अर्पिता मुखर्जीच्या अन्य कंपन्यांच्या बँक खात्यांवरही ईडीकडून नजर ठेवण्यात येत आहे. या खात्यांचा वापर अवैध व्यवहार करण्यासाठी करण्यात आल्याचा संशय असून त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे. अर्पिताची आणखी बँक खाती आहेत का, हे शोधण्यासाठी त्यांची चौकशी सुरूच राहील, असे ईडीने म्हटले आहे. तसेच आता ईडीचे अधिकारी डायमंड सिटी आणि बीरभूममधील सुमारे 15 ठिकाणी छापे टाकण्याच्या तयारीत आहेत.
समोरा-समोर चौकशी
सातव्या दिवशी झालेल्या चौकशीत पार्थ चटर्जी यांनी घोटाळय़ाचा खुलासा करत अन्य सहकारी नेत्यांच्या सांगण्यावरून नोकऱया दिल्याचे सांगितले. दरम्यान, अर्पिता आणि पार्थ यांची शनिवारी समोरा-समोर बसवून ईडीच्या अधिकाऱयांनी चौकशी केली. दुसरीकडे, टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱया निदर्शकांना पोलिसांनी हटवले आहे.
सीबीआय, प्राप्तिकर विभागही सज्ज
ईडीचा तपास पूर्ण झाल्यानंतर लवकरच या प्रकरणात सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाचीही एन्ट्री होऊ शकते. बेनामी संपत्तीप्रकरणी प्राप्तिकर विभाग पार्थ चटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांची चौकशी होऊ शकते. बेपत्ता झालेल्या 4 गाडय़ांचा अद्याप शोध लागलेला नसल्याची माहिती आहे. या गाडय़ांमध्ये पैसे पाठवण्यात आल्याचा ईडीच्या अधिकाऱयांना संशय आहे.









