मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा
प्रतिनिधी /पणजी
रात्री होणारे 95 टक्के अपघात मद्यप्राशन केल्यामुळे होतात, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणे रोखण्यासाठी वाहतूक नियमात दुरूस्ती करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याशिवाय बार-रेस्टॉरंटना मद्य ग्राहकांना पुरवण्यावर काही बंधने घालण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
बुधवारी मध्यरात्रीनंतर झुआरी नदीत कार पडून झालेल्या भीषण अपघातासंदर्भात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की आतापर्यंत झालेल्या अपघातांच्या पालीस तपास चौकशीतून ते सत्य समोर आले आहे. वाहन चालकांना दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात येते. त्यामुळे मद्यप्राशन करून वाहने चालवणे टाळण्यासाठी कायदे आणखी कडक करणे आता आवश्यक झाले आहे. जीवाच्या, वाहनचालकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कडक नियम-कायदे करण्याशिवाय आता पर्याय नाही. रात्री व दिवसाही मद्यप्राशन करून वाहने चालवणे धोकादायक असून ते सर्वांनी टाळले पाहिजे असे डॉ. सावंत म्हणाले.
कायदे कडक करण्यात आले आहेत तथापि रात्री-अपरात्री पोलीस वाहने थांबवू शकत नाहीत आणि सर्व रस्त्यावर पोलीस ठेवणेही शक्य नाही असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी नमूद केले. झुआरी अपघातात 4 जणांचे बळी गेले हे दुःखदायक असून दुर्देवी आहे. अतिवेग रोखणे आणि त्यावर देखरेख ठेवणे यासाठी सीसीटीव्हीची योजना आहे. लोकांनी वाहने वेगाने चालवू नयेत. वाहतूक-पोलीस खाते यांच्या समन्वयाने सीसीटिव्ही बसवणार असल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.









