भातशेती लागवडीवर परिणामाची शक्यता : कडक उन्हामुळे ‘ऑक्टोबर हिट’ची आठवण
प्रतिनिधी /पणजी
अचानक पाऊस गायब झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे संपूर्ण गोवा धुक्यामध्ये लपेटला. गणेश चतुर्थीनंतर साधरणतः पाऊस कमी झाल्यावर जशी स्थिती असते तशी स्थिती ऐन जुलैमध्ये जनतेला अनुभवायला मिळाली.
शुक्रवारी किंचितसा पाऊस गोव्यातील काही भागात पडला. सत्तरी, फोंडा इत्यादी भागात मध्यम तथा हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाची शक्यता नसल्याचे भाकीत केल्याने सध्या भातशेती लागवड जोमात असताना शेतकरीवर्ग मात्र अडचणीत आला आहे. गेले 5 दिवस पाऊस गायब झालेला आहे. गेल्या रविवारी राज्यात मध्यम तथा हलक्या स्वरुपाचा पाऊस संपूर्ण गोव्यात पडला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी किंचित पाऊस पडला, मात्र त्यानंतर शुक्रवारपर्यंत पावसाने पुन्हा तोंड दाखविलेले नाही.
जुलैच्या अखेरच्या टप्प्यात गोव्यात भात रोपे काढून ती शेत जमिनीत लावली जातात. सध्या पाऊस गायब झाल्याने भातशेतीची कामे करणे सोपे झालेय खरे. परंतु, पाऊस पडला नाही तर या रोपांचे भवितव्य कठीण आहे. यामुळेच शेतकरी बराच अडचणीत आलेला आहे.
दुपारच्या उन्हामुळे नागरिक उकाडय़ाने हैराण
त्यातच पाऊस गायब झाल्याने ऑक्टोबर हिट कशी असते तशा पद्धतीच्या वातावरणाचा अनुभव ऐन जुलैमध्ये मिळाला आणि सायंकाळी उशिरापर्यंत वातावरण बरेच तापलेले होते. उकाडय़ाने नागरिक हैराण झाले आणि पहाटे मात्र संपूर्ण गोव्यात सर्वत्रच धुके पसरलेले होते. संपूर्ण गोव्यावर धुक्याची चादर पसरल्यासारखे वातावरण होते. धुके पडणे याचाच अर्थ पाऊस गायब झाला असा अनेक ज्येष्ठ नागरिक काढतात. हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवसांत पावसाची शक्यता वर्तविलेली नाही. पावसाच्या या विश्रांतीने मात्र शेतकरी अडचणीत आलेला आहे.









