विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री रयत विद्यानिधीच्या धनादेशाचे वितरण : ड्रोनद्वारे युरिया फवारणीचे शेतकऱयांना प्रात्यक्षिक
वार्ताहर /जांबोटी
शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे शेतकऱयांनी पारंपरिक कृषी पद्धतीमध्ये बदल करून शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, सरकारने शेतकऱयांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ घेऊन आपल्या जीवनात समृद्धी आणावी, असे वक्तव्य आमदार अंजली निंबाळकर यांनी केले. जांबोटी येथे कृषी खात्याच्यावतीने समग्र कृषी अभियान कार्यक्रम तसेच मुख्यमंत्री रयत विद्यानिधी धनादेशाचे वितरण अशा संयुक्त कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवारी आमदार निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी खात्याचे संयुक्त निर्देशक शिवणगौडा पाटील हे होते.
प्रारंभी मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी प्रास्ताविक केले. खानापूरचे कृषी निर्देशक डी. बी. चव्हाण यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर कृषी खात्याचे संयुक्त निर्देशक शिवणगौडा पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच कृषी अधिकारी शेतकऱयांच्या बांधावर या योजनेअंतर्गत आयोजित कृषी माहिती रथाचे उद्घाटन आमदार अंजली निंबाळकर व इतरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री रयत विद्यानिधी धनादेशाचे वितरण आमदार निंबाळकर यांच्या हस्ते या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
यावेळी समग्र कृषी अभियानाअंतर्गत ड्रोनद्वारे भात पिकावर नॅनो युरिया फवारणीचे प्रात्यक्षिक शेतकऱयांना दाखविण्यात आले. तसेच शेतकऱयांनी ज्यादा दुग्धउत्पादन, दुधातील फॅटचे प्रमाण वाढविण्यासाठी शेतात अझोला या गवताची लागवड करण्याची माहिती मत्तिकोप येथील केएलई कृषी विज्ञान केंद्राचे जी. बी. विश्वनाथ यांनी दिली. संयुक्त कृषी निर्देशक शिवनगौडा पाटील यांनी शेतकऱयांच्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी राज्य शासनाने महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱया शेतकऱयांच्या मुलांना मुख्यमंत्री रयत विद्यानिधी ही योजना सुरू केली असून त्या योजनेबद्दलची सविस्तर माहिती शेतकरी व विद्यार्थ्यांना देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जांबोटी ग्रा. पं. अध्यक्ष महेश गुरव, आत्मा योजनेचे योजना अधिकारी एम. सी. मठ्ठद, फलोत्पादन खात्याचे सहाय्यक निर्देशक समर्थ, ग्रा. पं. सदस्य मंजुनाथ मुतगी, सूर्यकांत साबळे, कृषी अधिकारी व शेतकरीवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









