कॅन्टोन्मेंट शाळेची परिस्थिती : अपुऱया मैदानाचा मुद्दा ऐरणीवर, कराराची चौकशी करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट शाळेत एनसीसी प्रशिक्षण सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र याकरिता आता अपुऱया मैदानाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कॅन्टोन्मेंटने शाळेचे मैदान खासगी कंपनीला 25 वर्षांच्या कराराने विनामोबदला दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता एनसीसी प्रशिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे. या ठिकाणी निर्माण केलेल्या अत्याधुनिक मैदानाचा लाभ कोणाला होणार? असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कार्यालयाजवळ चार माध्यमांच्या शाळा असून 1500 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील शाळेचे मैदान खासगी कंपनीला अत्याधुनिक मैदान निर्माण करण्यासाठी बीओटी तत्त्वावर देऊ केले आहे. या मोबदल्यात कॅन्टोन्मेंटला कोणताच नफा मिळणार नाही. पण विद्यार्थ्यांना एनसीसी प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी पालकवर्गांतून होत आहे. त्यामुळे सरकारनियुक्त सदस्य सुधीर तुप्पेकर यांनी हा मुद्दा कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत मांडून एनसीसी प्रशिक्षण सुरू करावे, अशी विनंती अध्यक्ष ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांच्याकडे
केली.
यापूर्वी एनसीसी कार्यालयाला पत्र पाठवून प्रशिक्षण सुरू करावे, अशी विनंती करण्यात आली होती. एनसीसीच्यावतीने मैदानाची पाहणी करून हे मैदान परेड किंवा अन्य व्यायाम करण्यासाठी अपुरे पडते. लांबउडी, उंचउडी, धावपट्टी व अन्य व्यायामांसाठी वेगवेगळे मैदान निर्माण करावे लागते. त्यामुळे हे मैदान उपयुक्त नसल्याचे सांगून एनसीसी प्रशिक्षण देण्यास नकार दिल्याची माहिती साहाय्यक कार्यकारी अभियंता सतीश मण्णूरकर यांनी बैठकीत दिली.
हे मैदान शाळेसाठी राखीव ठेवण्याऐवजी खासगी कंपनीला देण्याची गरज काय? असा मुद्दा तुप्पेकर यांनी उपस्थित केला. कॅन्टोन्मेंट परिसरात अन्य ठिकाणी खुल्या जागा आहेत. त्या ठिकाणी हे मैदान सुरू करता आले असते. पण या मैदानामुळे आता विद्यार्थ्यांना एनसीसी प्रशिक्षणापासून वंचित रहावे लागणार असल्याची खंत बैठकीत व्यक्त केली. तसेच मैदानाच्या कराराची चौकशी करण्याची विनंती ब्रिगेडिअर मुखर्जी यांच्याकडे केली.
धोबीघाट परिसरात मैदान असून या परिसरात एनसीसीसाठी परेड मैदान सुरू करता येईल. त्याकरिता एनसीसीच्या अधिकाऱयांशी चर्चा करून मैदानाची पाहणी करण्याची सूचना ब्रिगेडिअर मुखर्जी यांनी अधिकाऱयांना केली.









