पहिल्या टी-20 सामन्यात 68 धावांनी एकतर्फी विजय
टारोबा / वृत्तसंस्था
कर्णधार रोहित शर्मा (44 चेंडूत 64), दिनेश कार्तिक (19 चेंडूत नाबाद 41) यांच्या चौफेर फटकेबाजीच्या बळावर भारताने येथील पहिल्या टी-20 सामन्यात 68 धावांनी सहज विजय संपादन केला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित 20 षटकात 6 बाद 190 धावा केल्या तर प्रत्युत्तरात विंडीजला 20 षटकात 8 बाद 122 धावांवर समाधान मानावे लागले. भारताने आपल्या डावातील शेवटच्या 3 षटकात चक्क 45 धावा वसूल केल्या.
विजयासाठी 191 धावांचे कडवे आव्हान असताना विंडीजचा संघ एकदाही आश्वासक वाटचाल करत असल्याचे जाणवले नाही. ब्रूक्सने 15 चेंडूत 20 धावा केल्या आणि हीच त्यांची डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. अन्य सहकाऱयांनीही निराशाच केली व त्यांना मालिकेत पिछाडीवर जाणे भाग पडले. भारतीय संघातर्फे अश्विन, अर्शदीप व रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 तर जडेजा व भुवनेश्वर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. उभय संघातील दुसरी टी-20 दि. 1 ऑगस्ट रोजी होईल.
संक्षिप्त धावफलक
भारत ः 20 षटकात 6 बाद 190 (रोहित शर्मा 44 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह 64, सूर्यकुमार यादव 16 चेंडूत 24, दिनेश कार्तिक 19 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 41, रविचंद्रन अश्विन 10 चेंडूत नाबाद 13. अवांतर 17. अल्झारी जोसेफ 2-46, मकॉय, होल्डर, होसेन, किमो पॉल प्रत्येकी 1 बळी).
विंडीज ः 20 षटकात 8 बाद 122 (शमरह ब्रूक्स 15 चेंडूत 20, किमो पॉल 22 चेंडूत नाबाद 19, निकोलस पूरन 18, मेयर्स 6 चेंडूत 15, पॉवेल व हेतमेयर प्रत्येकी 14, होसेन 11. एकूण 6. रविचंद्रन अश्विन 2-22, अर्शदीप सिंग 2-24, रवि बिश्नोई 2-26, जडेजा, भुवनेश्वर कुमार प्रत्येकी 1 बळी).









