वृत्तसंस्था/ महाबलीपूरम
येथे सुरू झालेल्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघांनी खुल्या व महिलांच्या विभागात विजयी सुरुवात केली.
महिलामध्ये अग्रमानांकन मिळालेल्या भारत अ संघाने ताजिकिस्तानचा तर ब संघाने वेल्सचा संघाचा पराभव केला. दोन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर 3-0 अशी विजयी आघाडी मिळविली होती. अ संघातील कोनेरू हंपी, आर. वैशाली व भक्ती कुलकर्णी यांनी विजय मिळविले. भारत क संघानेही विजयी सुरुवात केली. भारताच्या तीन पुरुष संघांनीही पहिल्या लढतीत विजय मिळविले असून त्यांनी अनुक्रमे झिम्बाब्वे, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण सुदान यांच्यावर मात केली.
या ऐतिहासिक स्पर्धेच्या पहिल्या फेरीचे उद्घाटन क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी विदित गुजरातीच्या सामन्यात पहिली चाल खेळून केले. माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंद, फिडे अध्यक्ष अरकाडी द्वोरकोविच, भारतीय फेडरेशनचे अध्यक्ष संजय कपूर व ऑलिम्पियाडचे संचालक भरत सिंग चौहान याप्रसंगी उपस्थित होते.









