वृत्तसंस्था/ दुबई
2023 आणि 2025 साली होणाऱया आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्यांचे यजमनापद पुन्हा लंडनच्या लॉर्ड्स मैदानाला मिळाले आहे. आयसीसीची ही स्पर्धा पहिल्यांदा 2021 साली भरविण्यात आली आणि या स्पर्धेचा अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावर खेळविला जाणार होता पण कोरोना महामारीमुळे या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले होते आणि हा सामना साऊदम्पटनच्या एजेस बॉल मैदानावर खेळविण्यात आला.
2021 साली झालेल्या आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचे अजिंक्यपद न्यूझीलंडने पटकाविले. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. 2023 आणि 2025 साली होणाऱया या स्पर्धेतील अंतिम सामना लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळविला जाईल आणि या निर्णयाला आयसीसीच्या मंडळाने अधिकृत मान्यता दिली आहे. आयसीसी पुरुषांच्या क्रिकेट समितीमध्ये न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनिएल व्हेटोरी तसेच विंडीजचा माजी क्रिकेटपटू रॉजर हार्पर, भारताचा व्हीव्हीएस लक्ष्मण आणि लंकेचा महेला जयवर्धने हे सदस्य म्हणून कार्यरत राहतील. 2025 साली होणारी महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात खेळविली जाणार आहे. त्याचप्रमाणे 2027 साली होणारी आयसीसीची महिलांची टी-20 चॅम्पियन्स करंडक स्पर्धा लंकेत खेळविली जाईल. बांगलादेशला याच कालावधीत दुसऱयांदा महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भरविण्याची संधी मिळाली आहे.









