आज सुनावण्यात येणार शिक्षा : छेडछाड करणाऱयांना अकरावे जिल्हासत्र न्यायालयाचा दणका : चार वर्षांपूर्वी रेल्वेमध्ये घडली होती घटना
प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वेमध्ये महिलांची छेड काढणे तसेच वादावादी होण्याचे प्रकार वारंवार घडतात. अशाच प्रकारे एका जवानाच्या पत्नीची छेड काढून त्यानंतर जवानाला व त्याच्या पत्नीला कुटुंबासमोरच जबर मारहाण केली. त्यानंतर महिलेच्या गळय़ातील दागिने व रोख रक्कमदेखील लांबविली होती. या खटल्याची सुनावणी येथील अकरावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये झाली असून या प्रकरणात असलेले सहा आरोपी न्यायालयाने दोषी ठरविले आहेत. त्यामुळे अन्याय झालेल्या व्यक्तींना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी दयानंद सिंद्दीहट्टी (रा. कोन्नूर, ता. गोकाक) हा जवान सुटीवर आला होता. आपल्या कुटुंबासह तो पंढरपूरला दि. 31 मे 2018 रोजी गेला होता. पंढरपूरहून 1 जून 2018 रोजी आपल्या कुटुंबासह गोकाककडे परतत होता. यावेळी मिरजहून कॅसलरॉककडे येणाऱया पॅसेंजर रेल्वेमध्ये हे सर्व जण बसले होते. तेथे आरोपी अशोक भागी आणि त्याच्या इतर साथीदारांनी त्या जवानाच्या पत्नीची छेडछाड काढली.
त्याला विरोध केला. तरी देखील अशोक व त्याच्या साथीदारांनी छेडछाड काढणे सुरूच केले. त्यानंतर आपल्या काही समर्थकांना चिकोडी रेल्वेस्थानकावर बोलावून घेऊन रेल्वेतून बाहेर काढून त्या जवानाला आणि पत्नीला मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील रोख 9 हजार 400 रुपये आणि मंगळसूत्र लांबविले होते. त्यांनी जणू दरोडाच घातला होता.
या घटनेनंतर घटप्रभा पोलीस स्थानकात दयानंद सिंद्दीहट्टी यांनी धाव घेतली. मात्र त्यांनी बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाकडे फिर्याद देण्यास सांगितले. त्याठिकाणी दयानंद सिंद्दीहट्टी यांनी फिर्याद दिली. अशोक तिपान्ना भागी (वय 20), विठ्ठल बुद्दाप्पा होसूर (वय 24), शिवानंद उर्फ शिवाप्पा तिपान्ना भागी (वय 27), रामाप्पा बुद्दाप्पा होसूर (वय 32), गिरीमल्ला बुद्दाप्पा होसूर (वय 24), सिद्धराम सिद्धाप्पा भागी (वय 24, सर्व रा. कब्बूर, ता. चिकोडी) यांच्यावर फिर्याद देण्यात आली.
याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी या सर्वांवर भा.दं.वि. 143, 147, 354, 395 सहकलम 149 अन्वये गुन्हा दाखल केला. अकरावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये रेल्वे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक एस. एस. कौजलगी यांनी तपास करून दोषारोप दाखल केले होते. त्याठिकाणी 20 साक्षी, 62 कागदपत्र पुरावे तपासण्यात आले. त्यामध्ये हे सर्वजण दोषी आढळले आहेत. या सर्वांना शुक्रवार दि. 29 जुलै रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
पहिल्याच महिन्यात न्यायाधीशांनी संशयितांना ठरविले दोषी
अकरावे जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीशपदी रमाकांत चव्हाण यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी या खटल्याची सर्व प्रकारे पडताळणी केली. या न्यायालयामध्ये काम करणाऱया सरकारी वकील शैलजा पाटील यांनीही आपला युक्तिवाद केला. त्यानंतर हे सर्व दोषी आढळल्यामुळे न्यायाधीश रमाकांत चव्हाण यांनी सर्वांना दोषी धरले आहे. त्यांना शुक्रवारी कोणती शिक्षा होणार, याकडे साऱयांचे लक्ष लागले आहे.
रेल्वेमध्ये छेडछाडीच्या घटना अधिक…
रेल्वेमध्ये महिला व तरुणींच्या छेडछाडीच्या घटना घडत असतात. मात्र अशा घटनांकडे कुटुंबीय दुर्लक्ष करत असतात. छेडछाड करणाऱया तरुणांच्या नादी कोण लागणार? त्यामुळे आपलीच बदनामी होते म्हणून बरेच जण फिर्याद देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे छेडछाड करणारे मोकाट राहतात. मात्र अशी छेडछाड करणाऱयांच्या विरोधात जर गुन्हा दाखल केला तर निश्चितच त्यांना शिक्षा मिळेल, तसेच अशा घटनांना आळा बसेल. तेव्हा फिर्याद दाखल करणे आणि न्यायालयात साक्ष दिल्यास रेल्वेमध्ये छेडछाड करणाऱयांना शिक्षा होऊ शकते. त्यामुळे महिलांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सरकारी वकील शैलजा पाटील यांनी म्हटले आहे.









