अनेक इच्छूकांची राजकीय कोंडी
कोल्हापूर / कृष्णात चौगले
जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर काही कारभाऱयांसह अनेक माजी पदाधिकारी निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वीच आऊट झाले आहेत. यामध्ये काही इच्छूक नेत्यांचा मतदार गट आरक्षित झाल्यामुळे त्यांना पर्यायी मतदार गट शोधावे लागणार आहेत. तर अनेकांना पर्यायच नसल्यामुळे त्यांना रिंगणाबाहेरच थांबावे लागणार आहे. यामध्ये माजी अध्यक्ष बजरंग पाटील, माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जयवंतराव शिंपी, माजी महिला व बालकल्याण सभापती स्वाती सासणे, कोमल मिसाळ, ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांना निवडणूक आखाडय़ात उतरता येणार नाही. तर गोकुळ शिरगाव आणि उत्तूर हे दोन मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत आणि उमेश आपटे या कारभाऱयांचा सभागृहात येण्याचा मार्ग बंद झाला आहे.
स्पर्धेत उतरण्यापूर्वीच अनेकांची दिग्गजांची विकेट
जि.प. प्रभाग रचनेबाबत अद्याप न्यायालयीन वाद सुरु असला तरी गुरुवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. यामध्ये अनेक दिग्गजांचे गट आरक्षित झाल्यामुळे ते निवडणुक रिंगणातून बाहेर फकले गेले आहेत. यामध्ये शाहूवाडी मतदारसंघातील चित्र पाहता शित्तूर तर्फ वारूण गट सर्वसाधारण झाल्यामुळे माजी आरोग्य व बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर यांची राजकीय सोय झाली आहे. सरुड गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यामुळे माजी आरोग्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांची विकेट गेली आहे. बांबवडे गट पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे माजी जि.प.सदस्य विजय बोरगे यांना पुन्हा संधी मिळाली आहे. पण येथून जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड इच्छूक आहेत. त्यामुळे सावे गटातून बोरगे यांच्या सौभाग्यवतींना मैदानात उतरावे लागणार आहे. येळवणजुगाई गटात सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्यामुळे माजी सदस्या आकांक्षा अमर पाटील यांची पुन्हा राजकीय सोय झाली आहे.
अनेकांचा पत्ता गट, काहींना पुन्हा संधी
पन्हाळा तालुक्यामध्ये सातवे, पोर्ले तर्फ ठाणे, कोतोली, कळे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे माजी सदस्य शिवाजी मोरे, शंकर पाटील व सर्जेराव पाटील यांची कोंडी झाली आहे. तर नव्याने निर्माण झालेल्या पुनाळ गटातून ओबीसी प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार आहे. सातवे गटातून माजी समाजकल्याण सभापती विशाल महापुरे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. हातकणंगले तालुक्यामध्ये शिरोली गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांना पुन्हा संधी मिळाली आहे. तर हेर्ले गट ओबीसी प्रवर्ग महिलासाठी आरक्षित झाल्यामुळे ज्येष्ठ माजी सदस्य अरुण इंगवले हे स्पर्धेत उतरण्यापूर्वीच बाद झाले आहेत. कोरोची आणि कबनूर हे दोन गट सर्वसाधारण झाल्यामुळे माजी सदस्य राहूल आवाडे यांना या दोन्हीपैकी एक गटातून निवडणूक लढवता येणार आहे. तर माणगावचे सरपंच राजू मगदूम यांना रुकडी गटातून संधी मिळण्याची शक्यता आहे.
गैयसोयीच्या ठिकाणी निवडावा लागणार पर्याय
शिरोळ तालुक्यातील दानोळी गटातून माजी महिला व बालकल्याण सभापती शुभांगी शिंदें यांची पुन्हा एकादा राजकीय सोय झाली आहे. उदगाव गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे माजी समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांचा पत्ता कट झाला आहे. तर माजी सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर आणि विजय भोजे यांच्यासाठी सोयीचे आरक्षण पडले आहे. कागल तालुक्यात माजी सदस्य युवराज पाटील यांच्या कसबा सांगाव गटात सर्वसाधारण आरक्षण पडले असले तरी ते आता आखाडय़ात उतरण्याची शक्यता कमी आहे. माजी शिक्षण सभापती अंबरिष घाटगे यांचा सिद्धनेर्ली जि.प.गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला असला तरी ते सर्वसाधारण आरक्षण असलेल्या बानगे गटाचा पर्याय निवडू शकतात. सेनापती कापशी गटातून शशिकांत खोत यांना सर्वसाधारण आरक्षणातून संधी मिळणार आहे. तर बोरवडे गटातून माजी सदस्य मनोज फराकटे यांच्या मातोश्री निवडणूक रिंगणात दिसणार आहेत.
करवीरमध्ये महिलाराज
करवीर तालुक्यातील एकूण 13 गटापैकी 9 गटात महिलाराज आहे. यामध्ये माजी समाजकल्याण सभापती कोमल मिसाळ, माजी सदस्या मनिषा कुरणे यांची संधी हुकली आहे. गोकुळ शिरगाव गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यामुळे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांची गैरसोय झाली आहे. तर प्रकाश टोणपे हे देखील निवडणूक रिंगणाबाहेरच राहणार आहेत. शिरोली दुमाला गटातून चेतन पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा सौभाग्यवतींना मैदानात उतरवले जाणार आहे. शिंगणापूर गट सर्वसाधारण झाल्यामुळे माजी शिक्षण सभापती रसिका पाटील यांचे पती अमर पाटील यांना लॉटरी लागली आहे. परिते गट सर्वसाधारण झाल्यामुळे माजी अध्यक्ष राहूल पाटील यांना सौभाग्यवतींना संधी द्यावी लागणार आहे.
सर्वसाधारण आरक्षणाच्या ठिकाणी इच्छूकांची भाऊगर्दी
गगनबावडा तालुक्यातील दोन्ही गट सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाल्यामुळे माजी अध्यक्ष बजरंग पाटील व ज्येष्ठ माजी सदस्य भगवान पाटील यांना निवडणूक आखाडय़ाबाहेरच रहावे लागणार आहे. राधानगरी तालुक्यातील सहा गटापैकी 4 सर्वसाधारण आणि 2 सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे इच्छूकांची भाऊगर्दी होणार आहे. आजरा नगरपालिका झाल्यामुळे हा गट रद्द झाला आहे. त्यामुळे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांना पुन्हा संधी मिळणार नाही. गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे गट सर्वसाधारण झाल्यामुळे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांचा सभागृहात येण्याचा मार्ग खुला झाला आहे. नेसरी गट ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे हेमंत कोलेकर यांची राजकीय कोंडी झाली आहे.
शिवसेनेच्या माजी आमदारांना उघड करावी लागणार भूमिका
शिवसेनेतील बंडखोरीनंतर आजतागायत शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील यांनी ‘नरोवा कुंजरोवा’ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. पण आता आरक्षणानंतर जि.प.निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यामुळे त्यांना आपली भूमिका जाहीर करावी लागणार आहे. अन्यथा इच्छूकांची कोंडी होणार आहे. तसेच आता शिवसेनेबरोबरच शिंदे गटही मैदानात दिसणार आहे.