द्रौपदी मुर्मू यांचा भारताच्या राष्ट्रपतीपदी नुकताच शपथविधी झाला आहे. त्यांनी भारताच्या या घटनात्मक सर्वोच्चपदाची सूत्रे हाती घेऊन 72 तास उलटतात न उलटतात तोच काँगेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांनी त्यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा करुन नव्या वादाला तोंड फोडले. अनेक नेते नेहमीच आपल्या ‘सैल जीभे’मुळे आपल्याच पक्षाला अडचणीत आणत असतात. प्रत्येक वेळी त्यांची दखल अग्रलेखाच्या माध्यमातून घेण्याची आवश्यकता नसते. पण ज्यावेळी राष्ट्रपतीपदासारख्या सर्वोच्च पदी विरामजमान व्यक्तीच्या संदर्भात बेजबाबदारपणे विधाने केली जातात तेव्हा त्यांचा विचार करणे भाग पडते. चौधरी यांचे ताजे विधान आणि त्यावर उठलेला गदारोळ यासाठीच महत्त्वाचा ठरतो. भारताच्या सर्वोच्च पदाधिकाऱयाला ‘राष्ट्राध्यक्ष’ नव्हे तर ‘राष्ट्रपती’ असे संबोधण्याची प्रथा आहे. सध्याच्या स्त्री-पुरुष समानतेच्या याच न्यायानुसार पती आणि पत्नी समानच मानले पाहिजेत. मग एक महिला राष्ट्रपतीपदावर आरुढ झाली तर तिला ‘राष्ट्रपत्नी’ म्हटले तर काय बिघडते? पत्नी ही पतीपेक्षा कमी दर्जाची असते का? असे साळसूद प्रश्न कोणत्यातरी उतावळय़ा पुरोगाम्याच्या डोक्यात उमटणारच नाही असे नाही. तसेच, राष्ट्रपतींना राष्ट्रपती असे संबोधल्याने कोणाच्याही मनात कुठलाही किंतू निर्माण होत नाही. तथापि याच पदावर असणाऱया महिलेला ‘राष्ट्रपत्नी’ म्हटल्याने असे काय आकाश कोसळते? राष्ट्रपत्नी या शब्दाला चुकीचे मानणे हे ‘पुरुषवर्चस्ववादा’चे लक्षण आहे, असाही टोकाचा अर्थ यातून काढला जाण्याची शक्यता आहे. तसेच काही भोळय़ाभाबडय़ा सर्वसामान्यांनाही तसे वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्टपतीमधील पती या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणे आवश्यक आहे. पती हा शब्द मराठी, हिंदी, किंवा कोणत्याही संस्कृत भाषेशी जवळ असणाऱया भाषेत विविध अर्थांनी उपयोगात आणला जातो. पती म्हणजे नवरा किंवा ज्याच्याशी आपले लग्न झाले आहे, तो पुरुष या अर्थाने तो जसा उपयोगात आणला जातो तसा त्याचा दुसरा अर्थ ‘स्वामी’ किंवा मालक असाही आहे. उदाहरणार्थ, भूमीपती या शब्दातील पती म्हणजे भूमीचा स्वामी किंवा मालक असतो. तो भूमीचा नवरा नसतो. त्याच अर्थाने ‘अधीपती’, ‘प्रजापती’, ‘गणपती’ आदी शब्द आहेत. पती हा शब्द काहीवेळा नेता किंवा प्रमुख या अर्थानेही किंवा जन्मादाता या अर्थाने घेण्याची पद्धत आहे. गणपती याचा अर्थ गणांचा किंवा लोकांचा, जनसमूहाचा नेता असा आहे. याचाच अर्थ असा की, पती हा शब्द विविध अर्थांनी उपयोगात आणला जातो. त्यातील एक अर्थ नवरा असा आहे. पण तोच केवळ अर्थ नाही. ‘पत्नी’ या शब्दाचे मात्र तसे नाही. पत्नी हा शब्द केवळ सहधर्मचारिणी किंवा बायको याच अर्थाने उपयोगात आणण्याची प्रथा आहे. पत्नी हा शब्द प्रत्येक वेळी पती या शब्दाचे स्त्रीलिंगवाचक स्वरुप असतो असे नाही. आता भारताच्या राष्ट्रपतींचे स्थान काय आहे ते पाहू. राष्ट्रपती हे घटनात्मकदृष्टय़ा आणि तांत्रिकदृष्टय़ा भारताच्या सर्व सार्वजनिक संपत्तीचे स्वामी किंवा मालक असतात. याचाच अर्थ असा की ते जणू देशाचेच मालक असतात. अर्थात ही ‘मालकी’ औपचारिक आणि पदसिद्ध असते. पदसिद्ध याचा अर्थ ‘जोपर्यंत ती व्यक्ती त्या पदावर असते तोपर्यंत’ असा आहे. त्याअर्थाने त्यांना राष्ट्रपती असे संबोधले जाते. देशाचा नवरा या अर्थाने नव्हे. परिणामी, एक महिला जर पदावर आरुढ झाली तर ती देशाची पत्नी नसते तर स्वामी किंवा मालकच असते. त्यामुळे त्यांचा उल्लेख ‘राष्ट्रपती’ असाच करणे आवश्यक आणि योग्य आहे. पदावर कोणीही असो तो किंवा ती राष्ट्रपतीच असते. हे अधीर रंजन चौधरी यांच्यासारख्या नेत्याला, खासदाराला आणि अनुभवी विद्वानाला माहीत नसेल, हे शक्य वाटत नाही. त्यामुळे त्यांनी द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा करणे हे अज्ञानाचे लक्षण नसून कुरापतखोरी आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल. मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊन पंतप्रधान मोदी आणि भाजपने बऱयाच लक्ष्यांचा वेळ एकाच बाणात केला आहे, असे अनेक विद्वान म्हणतात. भारताच्या सर्वोच्चपदी विराजमान होणाऱया त्या प्रथम आदिवासी (संघपरिवाराच्या भाषेत वनवासी) समाजातील नेत्या आहेत. सर्वाधिक काळ राज्यपालपदी राहण्याचा मानही त्यांनी मिळविला आहे. पुरोगामी विचारवंतांच्या दृष्टीने महत्त्वाची आणि (कदाचित झोंबणारी) बाब म्हणजे मुर्मू यांनी चक्क देवाच्या नावाने पदाची शपथ घेतली. आदिवासींसाठी देव वगैरे काही नसतो. त्यांनी देवाबिवाच्या भानगडीत पडणे म्हणजे आपल्या आदिवासी संस्कृतीला विसरणे किंवा या संस्कृतीशी प्रतारणा करणे, अशाही बऱयाच ‘अंधश्रद्धा’ निदान काही पुरोगाम्यांनी तरी उरीपोटी कवटाळल्या आहेतच. त्यांना मुर्मू यांनी धक्का दिला. हे काही त्यांना फारसे आवडले नसावे. पण तसा उघडपणे आक्षेप घेणे म्हणजे हिंदूंची (त्यात आदिवासीही आलेच) मते आणखी गमावणे, याची जाणीव पुरोगामी विचारवंत किंवा तसे राजकारणी यांना झाली आहे. त्यामुळे मग मनातली ही खदखद काहीतरी ‘बोलून’ बाहेर काढली की जरा बरे वाटत असावे. अशी अनेक कारणे अधीररंजन चौधरी यांच्या त्या विधानामागे असू शकतात. पण काहीही असले तरी त्यांनी तसे बोलावयास नको होते. त्यांच्या विधानामुळे भाजपची नव्हे, तर काँगेसचीच हानी होण्याची शक्यता जास्त. आधीच काँगेससाठी काळ आणि वेळ दोन्ही फारसे समाधानकारक नाहीत. त्यात असे बोलणे म्हणजे दुष्काळात धोंडा महिनाच नव्हे काय? पण अनेकांना बोलताना भान रहात नाही. स्वपक्षालाच घायाळ करणारे हे वाग्बाण असतात. चूक झाली आहे, क्षमायाचना करु, असे नंतर सांगून काही साध्य होत नाही. आधीच विचार करणे आवश्यक असते. काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये हे समजून घेणे शहाणपणाचे असते असेही मोठी माणसे सांगतात. अशाच बोलघेवडेपणाने नुकतेच एक राज्य सरकार कोलमडले हे आपण पाहिले आहे. ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे…’ असे समर्थ रामदासस्वामी म्हणतात. पण लक्षात कोण घेतो ?
Previous Articleभारत-लंका फुटबॉल लढत आज
Next Article भारतीय वंशाच्या खासदाराला जीवे मारण्याची धमकी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.