कोणता झेंडा घेऊ हाती घेऊ….अशी द्विधावस्था
खोची / भानुदास गायकवाड
शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्याबरोबर, जिह्याच्या राजकारणातही शिवसेनेच्या गोटामध्ये उलथापालथ होत आहे. यामध्ये कोल्हापूर जिह्यातील धैर्यशील माने वप्रा. संजय मंडलिक हे दोन्ही खासदार तर माजी मंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर आदीसह अनेक मान्यवर, नेतेमंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. अनेकांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. याचा परिणाम ग्रामीण भागावरही होऊ लागला आहे. निष्ठावंत व सच्च्या शिवसैनिकांना त्याचा मोठा धक्का बसला आहे. या राजकारणाच्या खेळामध्ये नेमका कोणता झेंडा हाती घ्यावा, याबाबत शिवसैनिकांमध्ये द्विधा मनःस्थिती आहे. बऱयाच राजकीय घडामोडींना सामोरे जावे लागत असल्यामुळे न्यायालयीन लढाईत पुढे काय होणार, याची प्रतीक्षा ग्रामीण भागातील निष्ठावंत शिवसैनिकांना लागून राहिली आहे. दुभंगलेली शिवसेना पुन्हा एकत्रित यावी, अशीही शिवसैनिकांची मनापासून इच्छा आहे.
हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटात सामील होऊन धक्का दिला आहे. अनपेक्षितपणे खासदार माने यांनी घेतलेली भूमिका निष्ठावंत शिवसैनिकांना रुचलेली नाही. पक्ष अडचणीत असताना अशा प्रकारची वेगळी भूमिका घेणे कितपत योग्य आहे, असा सवालही शिवसैनिकांकडून केला जात आहे. ग्रामीण भागात सर्वच गावांमध्ये शिवसेनेचे मोठे प्राबल्य आहे. गावपातळीवर पक्षाच्यावतीने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या जात नसल्या तरी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला मोठी ताकद या भागातून मिळत आहे.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये घालमेल सुरू आहे. ते कोणता निर्णय घेतात, याकडे शिवसैनिकांचे लक्ष आहे. डॉ. मिणचेकर दोनदा विधानसभेवर तसेच कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून प्रवीण यादव शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यामुळे या भागांमध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये बलाढय़ माजी खासदार राजू शेट्टींना जवळपास लाखभर मताने पराभूत करून खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघामध्ये पहिला शिवसेनेचा खासदार होण्याचा मान मिळवला आहे. त्यातच कोरोनामुळे दोन वर्षे विकासकामांना खीळ बसली होती. कोरोनाचे संकट दूर होत असतानाच राज्याच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप झाला. याचा दूरगामी परिणाम शिवसेनेच्या गोटामध्ये झाला आहे. भविष्यामध्ये नेमकी कोणती शिवसेना अस्तित्वात राहणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे न्यायालयीन लढतीमध्ये कोण जिंकतो, याकडेच निष्ठावंत शिवसैनिकांचे लक्ष आहे.
ग्रामीण भागातील अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरेंना आम्ही तुमच्या सोबतच आहोत. याबाबत प्रतिज्ञापत्र करून पाठवत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे व एकनाथ शिंदे यांच्या गटाचे अस्तित्व नेमके किती, हे एखादी निवडणूक झाल्याशिवाय समजणार नाही, हे मात्र निश्चित.