आरोग्य खाते सज्ज, लोकांनी सावधगिरी बाळगावी
प्रतिनिधी /पणजी
‘मंकी पॉक्स’ रुग्णांसाठी कम्युनिटी हेल्थ सेंटर (सीएचसी), जिल्हा आणि उपजिल्हा हॉस्पिटल तसेच कासावली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या असून गोव्यात येणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर नजर ठेवण्यात येत आहे.
विविध आजार जागृती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती देऊन सांगितले की, ‘मंकी पॉक्स’ आजारास तोंड देण्यासाठी आरोग्य खात्याने सर्व प्रकारची सज्जता ठेवली असून गोव्यात त्याचा रुग्ण सापडल्यास त्याची रवानगी राखीव बेडवर करण्यात येणार आहे. त्या आजाराचा बरा होण्याचा कालावधी 7 ते 21 दिवसांचा असून लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
‘मंकी पॉक्स’ हा संसर्गजन्य आजार असून लोकांनी काळजी घेण्याची व सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. हा आजार त्वचेला होत असून तेथे दुसऱया माणसाची त्वचा संपर्कात आली तर हा आजार जडू शकतो म्हणून त्या रुग्णांच्या संपर्कात जाणे टाळावे. कोरोनाचे जे नियम लागू आहेत तीच तत्वे या आजारास पाळावीत असा सल्ला त्यांनी दिला आहे.
रुग्ण वाढले तर मग बेड वाढवण्याचा विचार होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. संशयित रुग्ण आढळला तर त्याच्या प्रवासाची एकंदरीत माहिती जाणून घेण्यात येणार असून आरोग्य खाते त्या आजरास सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे, असे सूर्यवंशी यांनी नमूद केले.
मडगावात लहान मुलात ‘मंकी पॉक्स’ची लक्षणे : खासगी डॉक्टरच्या निरीक्षणाखाली उपचार
अंगावर लाल पुरळ येणे, तीव्र डोकेदुखी, सर्दी, तीव्र ताप, थकवा जाणवणे, स्नायूंमध्ये असह्य वेदना, निमोनिया, शरीरावर सूज, शरिरात ताकद न जाणवणे ही मंकी पॉक्सची लक्षणे आहेत. जवळपास अशीच लक्षणे मडगाव परिसरातील एका लहान मुलामध्ये आढळून आल्याने घबराट निर्माण झाली आहे. या मुलावर एका खासगी डॉक्टराकडून उपचार करून घेतले जात असल्याची माहिती मिळाली आहे.
लहान मुलांना ताप येणे, अंगावर पुरळ येणे, स्नायू दुखी या सारखी प्रकरणे गोव्यात आढळून येत असून अशा लहान मुलांवर बाल चिकित्सक डॉक्टर उपचार करीत आहेत. ही प्रकरणे कांजिण्यांची असू शकतात असे मतही व्यक्त केले जात आहे. आरोग्य खात्याने खासगी डॉक्टरांकडून अशा प्रकरणावर लक्ष ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कोविड महामारीच्या वेळी ‘भिवपाची गरज ना’ असे सांगून लोकांना गाफिल ठेवण्यात आले व त्यानंतर काय परिस्थिती उद्भवली याचा पुरेपूर अनुभव गोवेकरांनी घेतला आहे. तशाच प्रकारे मंकी पॉक्ससंदर्भात गाफील राहू नये असे मत सर्व सामान्यांकडून व्यक्त होत आहे.
मडगाव परिसरात लहान मुलाला मंकी पॉक्सची लक्षणे आढळून आली आहे. ते लहान मुल आपल्या पालकांसोबत पणजीत गेले होते. त्या ठिकाणी एका मुलाला अशाच प्रकारची लक्षणे होती. त्यामुळे संसर्गातून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे.
गोव्यात मंकी पॉक्सचा कोणताही गंभीर संशयित आढळलेला नाही, असे राज्याचे महामारी तज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी म्हटले आहे. एनआयव्ही, पुणे येथे पाठवण्यात आलेल्या एकमेव संशयित प्रकरणाचा नमुना निगेटिव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. ही प्रकरणे कांजिण्यांचे असल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले होते.
मंकी पॉक्सबाबत सावधगिराr
देशात मंकी पॉक्सची गंभीर अशी प्रकरणे आढळून आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी चिंता करण्याची गरज नाही. मात्र गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याकारणाने राज्याचे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंदे, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि जीएमसी रुग्णालयाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लक्षणे असलेला रुग्ण आल्यास आरोग्य यंत्रणेला कळविण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी दिली आहे.
प्रामुख्याने मध्य आणि पूर्व आफ्रिकेमध्ये आढळणाऱया मंकीपॉक्स चे रुग्ण आता युरोप ऑस्ट्रेलियाबरोबर 19 देशांमध्ये आढळून आल्याने कोरोनाबरोबर या नव्या रोगाने जगभर भीती निर्माण केली आहे. सध्या तरी या रोगाचा रुग्ण राज्यात वा देशात सापडलेला नाही मात्र बाधित रुग्ण सापडलेल्या देशात घेऊन येणाऱया प्रवाशांबरोबर हा रोग देशात आणि राज्यात येऊ शकतो अशी भीती आरोग्य यंत्रणेला आहे.
डेंग्यू व चिकनगुनिया मडगाव परिसरात सद्या मोठय़ा प्रमाणात डेंग्यू व चिकनगुनियाचे रूग्ण आढळून येत आहेत. डेंग्यू व चिकनगुनिया झालेले रूग्ण खासगी हॉस्पिटलांमध्ये उपचार घेत असल्याने आरोग्य खात्यापर्यंत अधिकृत आकडेवारी पोचत नसल्याची माहिती हाती आली आहे. मडगाव व फातोर्डा परिसरात डेंग्यू व चिकनगुनियाचे रूग्ण आढळून येत आहे. खासगी हॉस्पिटलांनी दिवसाला किमान दोन-तीन रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. डेंग्यू व चिकनगुनिया रोखण्यासाठी मडगाव पालिकेतर्फे काही प्रभागांनी फॉगिंग करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.









