होंडा पोलीस चौकीवर धडक : अटक केलेल्या संशयितांना ताब्यात देण्याची मागणी : राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप
प्रतिनिधी /वाळपई
होंडा येथे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱयाला मारहाण केल्या प्रकरणी कादर शेख व सलिम चोरात(बिठ्ठोण) दोन संशयितांना अटक करण्यात आली होती. सदर संशयितांना आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत सोमवारी रात्री उशिरापर्यंत स्थानिकांनी होंडा पोलीस चौकीवर आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र सदर संशयिताना होंडा पोलीस ठाण्यावर आणले नाही. होंडा येथे दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्यास स्थानिक जनता एकजुटीने त्यांचा समाचार घेईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे.
दोन दिवसांपूर्वी होंडा येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱया महादेव गावकर यांना क्षुल्लक कारणावरून मारहाण करण्याचा प्रयत्न अज्ञात इसमांनी केला होता. त्यानंतर स्थानिकांनी होंडा पोलीस चौकीवर धडक देत संबंधितांची अटकेची मागणी केली होती. पोलिसांनी तपास करून सदर दोघांचाही पत्ता शोधून काढला व त्यांना सोमवारी दुपारी अटक केली.
अटक करून त्यांना वाळपई पोलीस स्थानकावर आणले होते. याची माहिती मिळताच होंडा येथील स्थानिकांनी अटक करण्यात आलेल्या दोघांनाही होंडा पोलीस चौकीवर आणावे, अशी मागणी केली होती. यासाठी सुमारे 30 स्थानिक नागरिक होंडा पोलीस चौकीवर संध्याकाळी जमा झाले होते. रात्री उशिरापर्यंत नागरिक त्या ठिकाणी होते.
संशयितांना आंदोलकांसमोर आणणे कायद्याने गुन्हा !
वाळपईचे मामलेदार कौशिक देसाई यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी डिचोली पोलीस उपधीक्षक सागर एकोस्कर यांनीही घटनास्थळी येऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आपली मागणी कायम असून संशयिताना होंडा येथील पोलीस ठाण्यावर घेऊन सर्वांसमक्ष माफी मागावी, अशी मागणी केली मात्र पोलिसांनी ती मागणी धुडकावून लावली. संशयितांना आंदोलनकर्त्यांसमोर आणणे कायद्याने गुन्हा ठरत असून तशी कृती आपण करणार नसल्याचे सागर एकोस्कर यांनी यावेळी स्पष्ट केले.
पोलीस माफी मागतात मग गुन्हेगार का नाहीत मागत
दरम्यान, स्थानिकांनी संशयितांना होंडा या ठिकाणी देऊन सर्वांसमक्ष माफी मागण्याची जोरदार मागणी केली. मात्र पोलिसांनी ती अमान्य केली. यावेळी आक्रमक बनलेल्या स्थानिकांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली व पोलीस गुन्हेगारांच्यावतीने माफी मागू शकतात, मग गुन्हेगार का नाही मागू शकत? असा सवाल यावेळी त्यांनी केला.
राजकीय हस्तक्षेप : स्थानिकांचा आरोप
दरम्यान यावेळी पोलिसांची झालेल्या चर्चेदरम्यान, या प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय स्थानिकांनी केला. सत्ताधारी पक्षाचा संबंध या गुन्हेगारांशी असून यामुळेच पोलीस याप्रकरणी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे. यापुढे असा प्रकार घडल्यास गंभीर परिणाम होतील, इशारा स्थानिकांनी यावेळी दिला.









