
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक शिक्षण खाते व वनिता विद्यालय इंग्लिश मिडियम स्कूल आयोजित कॅम्प विभागीय फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात सेंट पॉल्सने इस्लामिया संघाचा 3-1 असा तर मुलींच्या गटात सेंट जोसेफ संघाने मराठी विद्यानिकेतनचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले.
मराठी विद्यानिकेत मैदानावर आयोजित कॅम्प विभागीय फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात इस्लामिया संघाने सेंट झेवियर्स संघाचा टायब्रेकरमध्ये 3-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये इस्लामियाने 3-1 असा विजय मिळविला. इस्लामियातर्फे रियान बेपारी, किजर जमादार, रिहान रोटीवाले यांनी तर सेंट झेवियर्सतर्फे पंकज अनगोळकरने एकमेव गोल केला. दुसऱया उपांत्य सामन्यात सेंट पॉल्सने सेंट मेरीज संघाचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यात पाचव्या मिनिटाला सेंट पॉल्सच्या कौशल्य मोरेने पहिला गोल केला.
20 व्या मिनिटाला जोशवा वॉझने दुसरा गोल केला. दुसऱया सत्रात 32 व्या मिनिटाला सेंट मेरीजच्या गौरवने गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. 34 व्या मिनिटाला सेंट पॉल्सच्या झियान बेपारीने तिसरा तर सेनन कोलकारने चौथा गोल करून 4-1 फरकाने विजय साकार केला.
अंतिम सामन्यात सेंट पॉल्स व इस्लामिया या सामन्याचे उद्घाटन कॅम्प विभागीय शारीरिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नागराज भगवण्णावर, ज्ये÷ फुटबॉलपटू अल्लाबक्ष बेपारी, प्रशांत देवदानम यांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करून देण्याने झाले. सेंट पॉल्सने सातव्या मिनिटाला जोशवा वॉझने पहिला गोल केला.
तेराव्या मिनिटाला इस्लामियाच्या रेहान बेपारीने बरोबरीचा गोल करून सामन्यात रंगत निर्माण केली. दुसऱया सत्रात तिसाव्या मिनिटाला नवल शेखने सेंट पॉल्सला दुसरा गोल करून दिला तर 35 व्या मिनिटाला सेंट पॉल्सच्या अमानुल्लाने तिसरा गोल करून 3-1 फरकाने विजय मिळवित जेतेपद पटकावले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुण्या शहर शारीरिक शिक्षणाधिकारी जे. बी. पटेल यांच्या हस्ते विजेत्या सेंट पॉल्स, सेंट जोसेफ, उपविजेत्या इस्लामिया व मराठी विद्यानिकेतन संघांना चषक देवून गौरविण्यात आले. यावेळी फादर सॅबॅस्टिन परेरा, फादर सॅव्हीओ, अल्लाबक्ष बेपारी, प्रशांत देवदानम, कोतवाल, तौफिक कादरी, अखिलेश अष्टेकर आदी उपस्थित होते.









