संशयितांना ताब्यात देण्याची स्थानिकांची पोलिसांकडे मागणी
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी होंडा येथील पेट्रोलपंप कर्मचाऱयावर रविवारी संध्याकाळी अज्ञात इसमानी हल्ला करून त्याला मारहाण केल्यानंतर संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र हल्लेखोर न सापडल्यामुळे रात्री उशिरापर्यंत स्थानिकांनी होंडा पोलीस चौकीवर ठाण मांडले होते. जोपर्यंत संशयिताला अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नसल्याचा इशारा स्थनिकांनी दिला होता. याची दखल घेऊन सोमवारी वाळपई पोलिसांनी कादर शेख, सलिम चोरावत (राहणार बिठ्ठोण) या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना वाळपई पोलिस स्थानकात ठेवण्यात आले आहे. त्यांना होंडा पोलीस चौकीवर आणून पोलिसांनी आमच्या ताब्यात द्यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
स्थानिकांनी सोमवारी पुन्हा एकदा होंडा पोलीस स्थानकावर जमाव करून संशयितांना ताब्यात देण्याची मागणी केल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तणावाची परिस्थिताची दखल घेऊन वाळपई मामलेदार कौशिक देसाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी आपली मागणी लावून धरल्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकावर तणावाची परिस्थिती कायम होती.
पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी स्थानिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी संशयितांना ताब्यात देण्याची मागणी केली होती. रात्री उशिरापर्यंत ही मागणी लावून धरली होती. मिळालेल्या माहितीनुसार दोघाही संशयतावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्थानिकांनी सांगितले की, अज्ञातांनी चाकू व सूरे घेऊन पेट्रोल पंपावरील कर्मचारी महादेव गावकर यांच्यावर हल्ला केला. अशा प्रकारची दहशत ही समाजासाठी अत्यंत घातक असून ती कदापि खपवून घेतली जाणार नाही. सत्तरी तालुक्मयातील नागरिकांवर जर कोण अन्याय करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.









