ठिकठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच : शौचालय सुविधा नसल्यामुळे नैसर्गिक विधी उघडय़ावर : चेंजिग रुमचा आभाव

प्रतिनिधी /वाळपई
पावसाळी मोसमात सत्तरी तालुक्मयातील विविध भागात कोसळणाऱया धबधब्यांवर रविवारी मोठय़ा प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. मात्र काही पर्यटकांनी हुल्लडबाजी करून बेशिस्त वर्तन करून अस्ताव्यस्तपणे दारूच्या बाटल्या फेकल्या. यामुळे स्थानिकांत तीव्र स्वरूपात संताप व्यक्त होत आहे. सरकारच्या संबंधित यंत्रणेने अशा बेशिस्त पर्यटकांना आळा घालावा, अशी मागणी केली जात आहे.
सत्तरी तालुक्मयात अनेक ठिकाणी पावसाळी धबधबे कोसळतात. सामान्यपणे शनिवारी व रविवारी या धबधब्यांवर सहलीसाठी गोव्याच्या वेगवेगळय़ा भागातून मोठय़ा संख्येने पर्यटक भेट देतात. काल रविवारी सत्तरी तालुक्मयातील पाली, हिवरे, चरावणे, कुमठोळ, नानेली, सालेली अशा अनेक धबधब्यांवर दिवसभर पर्यटकांनी गर्दी केली होती.
धबधबा परिसरात बाटल्या, कचऱयाचे ढीग
दरम्यान, अनेकवेळा विनंती करूनही पर्यटकांनी दाद दिली नाही. मिळेल त्याठिकाणी दारूच्या बाटल्या फेकणे व प्लास्टिकच्या बाटल्या फेकण्याचा प्रकार घडला. यामुळे धबधब्याच्या परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात कचऱयाचा व बाटल्यांचा खच पहावयास मिळाला. सदर प्रकार अत्यंत बेशिस्तपणाचा आहे. येथील धबधबे हे दारू पिऊन धिंगाणा घालण्यासाठी नाही तर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आहे अशी प्रतिक्रिया स्थानिकांतून व्यक्त करण्यात आली.
बंदोबस्त असूनही नजरेआड बाटल्या फेकण्याचे प्रकार
दरम्यान, अबकारी खात्याच्या कर्मचाऱयांतर्फे अनेक ठिकाणी झाडाझडती घेण्यात येत होती. त्याचप्रमाणे पोलिसांनी या संदर्भात कडक कारवाई करण्यात आली. मात्र अनेक पर्यटकांनी पोलीस व अबकारी खात्याच्या कर्मचाऱयांची नजर चुकून धबधब्यावर मोठय़ा प्रमाणात दारूचा साठा नेऊन सदर ठिकाणी धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केल्याचे स्थानिकांनी सांगितले.
सालेली धबधब्यावर हुल्लडबाजी
होंडा सालेली येथील धबधब्यावर मोठय़ा प्रमाणात पर्यटकांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रकार केला आहे. अनेक ठिकाणी बाटल्या फेकण्यात आल्या होत्या तर काही ठिकाणी काचेच्या बाटल्या फोडून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. सदर धबधब्यावर आलेल्या कुटुंबासह आलेल्या महिलांची छेडछाडही करण्याचा प्रकार घडल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे संबंधित खात्याच्या यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सुविधा नसल्यामुळे गैरसोय अनेक धबधब्यावर महिला भगिनी मोठय़ा प्रमाणात सहलीसाठी येत असतात. मात्र सदर ठिकाणी कपडे बदलणे व शौचालयाची व्यवस्था नाही. यामुळे अनेकांची मोठी गैरसोय होत आहे. या सुविधा नसल्यामुळे पर्यटक उघडय़ावरच नैसर्गिक विधी करतात. यामुळे धबधब्याच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होते अशा तक्रारी स्थानिकांनी केलेल्यां आहेत.









