दोन्ही रेल्वेगेटवर वाहतूक कोंडी : वाहनचालकांतून तीव्र संताप
प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी येथील पहिले व दुसरे रेल्वेगेट परिसरात रविवारी सायंकाळी तब्बल 25 मिनिटे रेल्वे थांबल्यामुळे रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली होती. वाहनचालक रेल्वेगेटनजीक अडकल्याने वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. वारंवार रेल्वे थांबण्याची समस्या जाणवत असल्यामुळे यावर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.
रविवारी सायंकाळी 5.25 वा. म्हैसूर-दादर शरावती एक्स्प्रेस टिळकवाडी परिसरात दाखल झाल्यानंतर थांबली. पुढील सिग्नल मिळत नसल्याने बराच काळ एक्स्प्रेस जाग्यावरच होती. एक्स्प्रेस येण्यापूर्वी पहिले व दुसरे रेल्वेगेट बंद करण्यात आल्याने रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूंनी वाहनचालक अडकले होते. बराचवेळ झाला तरी रेल्वे पुढे सरकत नसल्याने रेल्वे का थांबली याची चर्चा सुरू होती. तब्बल 25 मिनिटांनी सिग्नल मिळाल्यानंतर एक्स्प्रेस रेल्वे स्थानकात दाखल झाली. रेल्वेगेट बराचवेळ बंद असल्याने इतर मार्गांनी नागरिकांनी पुढे जाणे पसंतकेले.
समस्या कायमची दूर करण्याची मागणी
पहिले व दुसरे रेल्वेगेट परिसरात रेल्वे थांबण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यापूर्वीही तीन ते चार वेळा रेल्वे थांबल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. रेल्वे स्थानकातून सिग्नल मिळत नसल्याने रेल्वे थांबत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात येत असली तरी ही समस्या कायमची सोडवावी, अशी मागणी केली जात आहे.









