सदर जागा आपल्या मालकीची असल्याचा इजाज अहमदी यांचा दावा : कायदेशीर कारवाई करणार असल्याची पत्रकार परिषदेत दिली माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
प्रसिद्ध कांदा मार्केटच्या जागेचा ताबा महापालिकेकडे आहे. मात्र सदर जागा सय्यद इनामदार परिवाराची असल्याचा दावा यापूर्वी करण्यात आला होता. मात्र याला आक्षेप घेत सदर जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा इजाज अहमदी यांनी केला. रविवारी पत्रकार परिषद घेऊन सय्यद इनामदार व लतीफखान पठाण यांनी दिलेली माहिती चुकीची व खोटी असल्याचे सांगत याबाबत आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
कांदा मार्केटच्या जागेबाबत इजाज अहमदी यांनी आपला मालकीचा दावा केल्याने या जागेच्या मालकी हक्काबाबत आता नवीन वळण आले आहे. सदर कांदा मार्केटची जागा ब्रिटिशांनी सनदद्वारे पचाबी सय्यद इनामदार यांना दिली होती. एकूण 2 एकर 21 गुंठे जागा असून याची देखभाल होत नसल्याने सदर जागेपैकी 1 एकर 38 गुंठे जागा पचाबी इनामदार यांच्या मॅनेजरनी 1856 मध्ये महापालिकेला लीज कराराने दिली होती. या मोबदल्यात वर्षाला 50 रुपये भू-भाडे महापालिकेकडून देण्यात येत होते. मात्र सदर जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करून सय्यद इनामदार यांनी जागेचा ताबा घेण्यासाठी न्यायालयाकडून आदेश मिळविला होता. मात्र महापालिकेने याबाबत आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतली होती. हा वाद सुरू असतानाच कर्नाटक राज्य वक्फबोर्डनेदेखील सदर जागा बग सिकंदर दर्ग्याची असल्याचा दावा केला होता. तर तो दावा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर सय्यद इनामदार तसेच कांदा मार्केट असोसिएशनचे पदाधिकारी लतीफखान पठाण, खादीर पाशा इनामदार व इतरांनी सदर जागा सय्यद इनामदार व बंधू यांच्या मालकीची असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती.
मात्र पत्रकार परिषदेत इनामदार आणि लतीफखान पठाण, खादीर पाशा इनामदार यांनी दिलेली माहिती चुकीची व खोटी असल्याचे इजाज अहमदी यांनी सांगितले. सदर जागा पचाबी इनामदार यांच्या मालकीची असून त्यांनी 1908 मध्ये माझे आजोबा महंमद इब्राहीमसाब अहमदी यांना मृत्यूपत्राद्वारे दिली आहे. त्यामुळे सदर जागा कायदेशीर कागदपत्रानुसार आमच्या मालकीची आहे. 1 एकर 38 गुंठय़ाचा ताबा महापालिकेकडे असून, उर्वरित जागेचा ताबा आमच्याकडे असल्याचे ईजाज अहमदी यांनी सांगितले. रविवारी पत्रकार परिषदेत सदर माहिती देत खोटी माहिती व अफवा पसरविणाऱयांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.