सिंदोगी जंगलात प्रथमच बिबटय़ाचे दर्शन
प्रतिनिधी /बेळगाव
सौंदत्ती तालुक्यातील सिंदोगी वनविभागात एक बिबटा मृतावस्थेत आढळून आला आहे. त्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असून प्रथमच या जंगलात बिबटय़ाचे दर्शन झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.
दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी बिबटय़ाचा मृतदेह आढळून आला. कुंपणाच्या तारेत अडकून या बिबटय़ाचा मृत्यू झाला असावा, असा संशय विभागीय वनाधिकारी शंकर अंतरगट्टी यांनी बोलून दाखविला. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच मृत्यूचे निश्चित कारण समजू शकणार आहे.
स्थानिक नागरिक व वनाधिकाऱयांच्या मते सिंदोगी परिसरातील जंगलात यापूर्वी कधीही बिबटय़ाचे अस्तित्व आढळून आले नव्हते. नरगुंद, नवलगुंद भागात अधूनमधून बिबटय़ाचे दर्शन होत होते. तोच या परिसरात आला असावा, असाही संशय आहे.
13 हजार हेक्टर वनप्रदेशात अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे. यापूर्वी अनेकवेळा कॅमेरा ट्रपमध्ये या प्राण्यांची छबी कैद झाली आहे. बिबटय़ाचे मात्र कधीच दर्शन झाले नाही. आता या बिबटय़ाचा मृत्यू कशामुळे झाला, याचा उलगडा शवचिकित्सा अहवाल आल्यानंतरच होणार आहे.