लाखोचा निधी खर्च करूनही दुर्लक्ष : दुरुस्तीसाठी खोदलेला खड्डा धोकादायक
प्रतिनिधी /बेळगाव
मारुती गल्ली व बसवाण गल्ली परिसरातील ड्रेनेजवाहिन्या तुंबल्याने नवीन वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. यासाठी लाखोचा निधी खर्च करूनही समस्यांचे निवारण झाले नाही. बसवाण गल्लीतील डेनेज समस्या जैसेथे असून या ठिकाणी सांडपाणी साचून आहे. तसेच दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेला खड्डा वाहनधारकांसाठी अडचण ठरत आहे.
महापालिकेचे काम आणि 6 महिने थांब असाच काही प्रकार बसवाण गल्ली डेनेज समस्येबाबत झाला आहे. सदर परिसरातील ड्रेनेज वाहिन्या तुंबत असल्याची तक्रार सातत्याने करण्यात आली होती. सकिंग मशिनद्वारा डेनेज वाहिनीची स्वच्छता करण्यात येत होती. पण कायमस्वरुपी तोडगा काढण्यात आला नाही. तब्बल दोन वर्षांनंतर ड्रेनेज वाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले. बसवाण गल्ली, मारुती गल्ली तसेच या परिसरातील विविध ठिकाणाच्या डेनेज वाहिन्या बदलण्यात आल्या. पण डेनेज वाहिन्या बदलल्यानंतरही या समस्येचे निवारण झाले नाही. येथील रस्ता खराब झाला असून काही ठिकाणी चेंबर खराब झाले आहेत.
त्याठिकाणी सांडपाणी साचून रहात असून दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला आहे. पण याची दुरुस्ती करण्यात आली नाही. याठिकाणी सांडपाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली आहे. तसेच खोदलेला खड्डा वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून खोदाई सत्र सुरू असल्याने निर्माण झालेल्या अडचणींचा फटका येथील व्यावसायिकांना आणि रहिवाशांना बसला आहे. या समस्येचे निवारण कधी होणार, असा मुद्दा उपस्थित होत असून मनपाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.