आंबोलीलाही विशेष बस : पर्यटकांचा वाढता ओढा : बससेवेला प्रतिसाद : सुरक्षित प्रवासाला पर्यटकांचे प्राधान्य
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहनने पर्यटकांच्या सोयीखातर वर्षा पर्यटनासाठी विशेष बसची सोय केली आहे. मागील आठ दिवसांपासून हिडकल डॅम, गोडचिनमलकी आणि गोकाक धबधब्यांसाठी बस धावत आहेत. रविवारी पर्यटकांचा ओघ वाढल्याने तब्बल दहा बस गोकाककडे धावल्या. शिवाय पर्यटकांच्या मागणीनुसार आंबोलीसाठीदेखील दोन बस सोडण्यात आल्या. त्यामुळे पर्यटकांना आंबोली आणि गोकाक येथील धबधब्यांचा आनंद लुटता आला.
जुलै महिन्याच्या पंधरवडय़ात दमदार पावसामुळे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे परिवहनने मध्यवर्ती बसस्थानकातून पर्यटकांसाठी विशेष बसची सोय केली आहे. दुसरा, चौथा शनिवार, रविवारी आणि सुटीच्या दिवशी या विशेष बस धबधब्यांच्या स्थळी धावत आहेत. रविवारी पावसाचे प्रमाण कमी असल्याने आणि सुटीचा दिवस असल्याने गोकाक आणि आंबोलीला जाणाऱया नागरिकांची संख्या वाढली होती. त्यामुळे बसस्थानकातून एक-दोन नव्हे तर तब्बल दहा बस सोडाव्या लागल्या.
बसस्थानकातून सकाळी 9 वाजल्यापासून बस सुरू झाल्या. पुढे हिडकल डॅम, गोडचिनमलकी आणि गोकाक अशा तीन ठिकाणी भेटी देण्यात आल्या. शिवाय आंबोली धबधब्यासाठी देखील बसस्थानकातून सकाळी बस मार्गस्थ झाली. त्यामुळे बेळगाव व परिसरातील नागरिकांना सोयीस्कर ठरले.
परिवहनची विशेष बस सुविधा उपलब्ध
मागील दोन वर्षात कोरोनामुळे पर्यटनावर निर्बंध आले होते. मात्र, यंदा सर्व धबधबे सुरळीत सुरू झाल्याने पर्यटकांचा ओघ वाढला आहे. दरम्यान, पर्यटकांच्या सोयीखातर परिवहनने विशेष बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गोकाकसाठी एका व्यक्तीला ने-आण करण्यासाठी 190 रुपये तिकीट आकारणी केली जात आहे.
पर्यटकांना एकाच दिवसात गोकाक येथील तीन पॉईंट पाहता येत आहेत. त्यामुळे सुरक्षित प्रवास म्हणून पर्यटक बसला प्राधान्य देत आहेत. गोकाक आणि आंबोली पर्यटनस्थळांना भेट देणाऱया पर्यटकांसाठी बसस्थानकात आगाऊ बुकिंग व्यवस्थाही पेली आहे. तसेच www.ksrtc.in ही वेबसाईटही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 7760991612, 7760991613 या क्रमांकावर संपर्क साधावा.