ही घटना इटली या देशातील आहे. या देशातील दोन स्टंटबाजांनी चालत्या कारगाडीचे चाक बदलण्याचा विक्रम केला असून तो गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदविला गेला आहे. या बहाद्दरांची नावे मॅन्युएल जोल्डन आणि झियानलुक फोल्को अशी असून त्यांच्यापैकी जोल्डन हा गाडीचा ड्रायव्हर आहे.
त्यांनी हा विक्रम केवळ काही तरी नवीन करायचे आणि जगाला आश्चर्यचकित करून सोडायचे, या एकाच ध्येयाने झपाटून केलेला आहे. यासाठी त्यांना बरीच मेहनत आणि सराव करावा लागला होता. जवळपास दोन वर्षे त्यांनी हा प्रयोग करून पाहिला होता. चालत्या गाडीचे चाक त्यांनी अवघ्या 1 मिनिट 17 सेकंदात बदलून दाखविले. त्यांनी केवळ नवीन विक्रम नोंदविला असे नाही तर अशाच प्रकारचा जुना विक्रम मोडीत काढला आहे. चालत्या गाडीचे चाक बदलणे सोपे काम नाही. थोडासा विलंब लागल्यास जीवाला धोका होण्याची शक्मयता असते. हा विक्रम करताना चालत्या गाडीचे स्टेअरिंग जोल्डन याने आपल्या नियंत्रणात ठेवले होते. तर चाक बदलण्याचे काम फोल्कोने केले. जोल्डन याने कार तिरकी करून एका बाजूच्या दोन चाकांवर चालवण्यास प्रारंभ केला. अशी कसरत फार काळ करता येणे शक्मय नव्हते. तेवढय़ाच सव्वा मिनिटाच्या कालावधीत फोल्को याने हवेत असणाऱया दोन चाकांपैकी एक चाक काढले आणि दुसरे चाक त्याजागी बसविले. जुने चाक खोलणे, बदलणे आणि नवीन बसविणे ही तिन्ही कामे त्याने जवळपास विद्युतवेगाने केली. यात कुठेही थोडीशी गडबड झाली असती तर फोल्को स्वतः गाडीखाली येण्याची शक्मयता होती. तसेच त्यांचा विक्रम फसण्याची शक्मयताही होती. पण त्यांनी धाडस दाखवून हे दिव्य केले आणि आता त्यांचे नाव जगभरात झालेले आहे. काही वर्षांपूर्वी असाच विक्रम 1 मिनिट 30 सेकंदांमध्ये करण्यात आला होता. तो आता मोडला गेला आहे. चाक बदलल्यानंतर कार कोणतीही अडचण न देता पुढे चारी चाकांवर प्रवास करत राहिली. यावरून त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याचे सिद्ध झाले. संधी मिळाल्यास पुन्हा असे काही तरी अचाट कार्य करण्यास आपल्याला आवडेल, असे दोघांनीही सांगितले आहे.









