वृत्तसंस्था/ काबुल
इंग्लंडचा माजी कसोटीवीर आणि आश्वासक फलंदाज जोनाथन ट्रॉटची अफगाण क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. अफगाण क्रिकेट मंडळाने गुरुवारी ही घोषणा केली.
येत्या ऑगस्टमध्ये अफगाणचा क्रिकेट संघ आयर्लंडच्या दौऱयावर जाणार असून ट्रॉट या दौऱयात आपल्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतील. जोनाथन ट्रॉटने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 2009 ते 2015 या कालावधीत 52 कसोटीत इंग्लंडचे प्रतिनिधीत्व करताना 44.08 धावांच्या सरासरीने 3835 धावा जमविल्या असून त्यामध्ये 9 शतके आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ट्रॉटने 226 धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. ट्रॉटने 68 वनडे सामन्यात इंग्लंडकडून खेळताना 51.25 धावांच्या सरासरीने 2838 धावा जमविल्या असून त्यामध्ये 4 शतके आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. अफगाणचा क्रिकेट संघ ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात आयर्लंडला प्रयाण करणार असून या दौऱयामध्ये उभय संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. या मालिकेला 9 ऑगस्टपासून प्रारंभ होईल.









