उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी.विराप्पा यांनी केले वकिलांना मार्गदर्शन
प्रतिनिधी/ बेळगाव
वकिलांसाठी एमव्हीसी या खटल्यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी. विराप्पा यांनी केले. यावेळी वकिलांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, पक्षकार हे न्याय मागण्यासाठी न्यायालयात येतात तेव्हा त्यांना तातडीने न्याय मिळेल यासाठी वकिलांनी जास्तीत जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुरलीधरा पै, हे होते.
पुढे बोलताना न्यायाधीश बी. विराप्पा म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशाचे पालन करून त्यांच्या मार्ग सूचीनुसार आत साऱ्यांनी काम केले पाहिजे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून जे नवीन कायदे अंमलात आणले जातात त्या चौकटीत प्रत्येकाने काम केले पाहिजे असे सांगितले.
प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत बार असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी गिरीश पाटील यांनी केले. त्यानंतर बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. त्यावेळी कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य विनायक मांगलेकर, के. बी. नाईक, वकिलांना मार्गदर्शन करण्यासाठी पुण्याहून आलेले ॲडव्होकेट रुषिकेश गणू, कर्नाटक राज्य कायदा प्राधिकारचे सेक्रेटरी एच. शशिधरा शेट्टी आणि मुंबईचे जनरल इन्शुरन्स कौन्सिल सल्लागार ए. एन. कृष्णस्वामी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला सर्व न्यायाधीश याचबरोबर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.