ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गृहमंत्रीपद मिळणार असेल तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करू, असं सूचक विधान मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये केले.
अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रात संवाद दौरे सुरू केले आहेत. शुक्रवारी त्यांनी दादर ते अंबरनाथ असा लोकलने प्रवास केला. अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर अंबरनाथ पूर्वेतील रोटरी सभागृह येथे विद्यार्थी तसेच पदाधिकारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
दरम्यान, पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना मनसेला दोन मंत्रिपदे मिळणार असल्याची चर्चा सुरू असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी गृहमंत्रीपद मिळणार असेल तर सत्तेत सहभागी होण्याचा विचार करू, पण ते देत नाहीत, असे अमित ठाकरे म्हणाले. अमित ठाकरेंच्या या विधानानंतर मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी मनसेने सरकारसमोर गृहमंत्रीपदाची अट ठेवली आहे का अशा चर्चांना आता सुरुवात झाली आहे.
हेही वाचा : शुक्ला, महाजनांविरोधातील गुन्ह्यांचा तपास CBI कडे?