नगरपालिका अतिक्रमण विभागाची कारवाई : नोटिसा देवून ही उभारले होते शेड : कारवाई वेळी शाब्दिक वाद
प्रतिनिधी/सातारा
सदरबझार येथील कत्तलखान्याशेजारी उभारण्यात आलेले अनाधिकृत शेडवर सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. शेड नगरपालिकेच्या जागेत उभारण्यात आल्याने शेड मालकांना नोटीसा पाठवून सुचना देण्यात आल्या होत्या. तरीही हे शेड हटविण्यात न आल्याने मंगळवारी पालिका कर्मचाऱयांनी या शेडवर जेसीबी चढवत हे शेड हटविले. यावेळी शेड मालक व कर्मचाऱयांच्यात शाब्दिक चकमक झाली.
सातारा नगरपालिकेच्या मालकीची जागा सदरबझार परिसरातील कत्तलखान्याशेजारी आहे. या जागेत अनाधिकृतपणे शेड उभारण्यात आले. हे शेड काढण्याच्या सुचना पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केल्या. परंतु याकडे दुर्लक्ष करत शेड मालकांचा मनमानी कारभार सुरू होता. तोच मंगळवारी पालिका कर्मचाऱयांनी दुपारी या ठिकाणी जावून कारवाईचा बडगा उगारला. हे अनाधिकृत रित्या उभे केलेले शेड वर जेसीबी फिरवला. अचानक कारवाईला सुरूवात झालेली पाहून हे शेड मालक यांनी विरोध केला. परंतु पालिका कर्मचाऱयांनी याकडे दुर्लक्ष करत अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू ठेवली होती. बऱयाच वेळ शाब्दिक चकमकही झाली. परिसरातील नागरिकांनी ही कारवाई पाहण्यासाठी गर्दी केली होती. या शेडमध्ये गोवंश जनावरे ठेवली जात असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. या कारवाईची चर्चा दिवसभर शहरात चांगलीच रंगली होती.
इतर भागातील अतिक्रमणावर कारवाई कधी?
सातारा शहरातील मोतीचौक, मंगळवार तळे रोड, कर्मवीरपथ, कासटमार्केट, एसटीस्टॅड परिसरात अतिक्रमणाचा विळखा घट्ट झाला आहे. या अतिक्रमणावर ठोस कारवाई होत नसल्याने येथे विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. तसेच बंद टपऱयाआडून जुगार-मटका खेळाला प्रोत्साहन मिळत आहे. असे असताना पालिकेच्या जागेत केलेले शेडचे अतिक्रमणावर ठोस कारवाई केल्याने पालिकेकडून जाणीवपूर्वक या विक्रेत्यांना पाठबळ देण्याचे काम सुरू आहे का ? अशी चर्चा सुरू आहे.









