‘तो’ माझा पती असल्याच्या वक्तव्याने बेळगावमध्ये खळबळ
प्रतिनिधी /बेळगाव
माझा विवाह होऊन मला तीन मुले आहेत. याबाबत सर्व माहिती देऊनही मला प्रेमाच्या जाळय़ात ओढून शारीरिक संबंध ठेवत त्याचे व्हिडिओ काढून मला धमकी दिली जात आहे. हॅनीट्रप करण्याचा प्रकार रामनगर जिल्हय़ातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या नव्यश्री यांनी केला आहे, असा आरोप करत फलोत्पादन विभागाचे अधिकारी राजकुमार टाकळे यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
बेंगळूर येथे नव्यश्री हिच्याबरोबर ओळख झाली. त्यानंतर तिने माझ्याशी मैत्री केली. मैत्रीनंतर माझ्याबद्दल पूर्ण माहिती तिला दिली. माझा विवाह झालेला असून मला तीन मुलेही आहेत. तरीदेखील तिने मला प्रेमाच्या जाळय़ात ओढले. त्यानंतर माझ्याशी शारीरिक संबंध ठेवून त्याचे व्हिडिओ काढले. आता ती आणि तिचे नातेवाईक माझ्याकडे 50 लाख रुपयांची मागणी करत आहेत.
गुन्हा दाखल करण्याची धमकी
रक्कम दे अन्यथा हे सर्व व्हिडिओ तुझ्या पत्नीकडे आणि नातेवाईकांकडे पाठवून देवू, अशी धमकी देत आहे. मला मानसिक त्रास देत असून जर रक्कम दिली नाही तर खोटा गुन्हा दाखल करून तुला कारागृहात डांबू, अशी धमकीही तिने दिली आहे. तेव्हा मला संरक्षण द्यावे, अशी मागणी फलोत्पादन खात्याच्या राजकुमार टाकळे यांनी केली आहे.
नव्यश्री ही परदेशामध्ये होती. याबाबत तिच्याशी काही प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला असता मी देशात आल्यानंतर बोलू, असे सांगितले होते. ती मंगळवारी बेळगावात दाखल झाली. यावेळी तिने राजकुमार टाकळे हा माझा पती असल्याचे प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे बेळगावसह संपूर्ण कर्नाटकमध्ये खळबळ उडाली आहे.