चंदगड तालुक्मयातील कुदनूर गावात होणार प्रतिष्ठापना : मूर्तिकारांची रात्रंदिवस मेहनत
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर हे मूर्तिकारांचे शहर म्हणून परिचित आहे. याला आता शिवमूर्ती घडविणारे गाव अशी नवीन ओळख निर्माण होत आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये बसविल्या जाणाऱया शिवमूर्ती बेळगावमध्ये तयार होतात. सध्या अशीच एक भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारुढ मूर्ती बेळगावात घडवली जात आहे. ही शिवमूर्ती तब्बल 25 फूट उंच असून देशातील सर्वात उंच शिवमूर्तींपैकी एक ठरणार आहे.
भांदूर गल्ली येथील मूर्तिकार विनायक मनोहर पाटील हे दोन महिन्यांपासून भव्यदिव्य शिवमूर्ती साकारत आहेत. 23 फूट लांब व 10 फूट रुंद फौंडेशनवर शिवमूर्ती साकारण्यात येत आहे. यासाठी बॉम्बे क्ले (मुंबई येथील चिकट माती) चा वापर करण्यात आला आहे. 30 किलोच्या 220 पिशव्या माती वापरून सध्या शिवमूर्ती तयार करण्यात आली आहे. मूर्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक भागाचे मोल्ड तयार करून त्यानंतर कास्टिंग ओतले जाणार आहे. पंचधातूची मूर्ती तयार झाल्यानंतर अंदाजे ती चार ते साडेचार टन वजनाची होणार आहे.
लोकवर्गणीतून प्रतिष्ठापना करणार
बेळगावपासून जवळ असणाऱया चंदगड तालुक्मयातील कुदनूर या गावी ही भव्य शिवमूर्ती बसविली जाणार आहे. कुदनूर गावच्या ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे काम सुरू केले आहे. विनायक पाटील यांच्या सोबत त्यांचे वडील ज्येष्ठ मूर्तिकार मनोहर पाटील, संदीप सर, प्रसाद पाटील, विनोद गेंजी, रमेश चौगुले, वैभव रेडकर, राजू लोहार हे मेहनत करून मूर्ती घडविण्याचे काम करीत आहेत.
सध्या औरंगाबाद शहरात 25 फूट उंच शिवमूर्ती आहे. त्यानंतर सर्वांत मोठी शिवमूर्ती बेळगावमध्ये तयार होत आहे. बऱयाच वेळा मोठय़ा मूर्ती तयार करताना मूर्तिकारांकडून अनेक चुका होत असतात. अश्वारुढ शिवमूर्ती तयार करताना घोडय़ाचा समतोल, घोडय़ाच्या मानाने मूर्तीची उंची याचा विचार केला जात नाही. परंतु विनायक यांनी महाराष्ट्रातील अनेक मूर्तिकार व शिवअभ्यासकांना बोलावून माहिती घेऊन मूर्ती घडविली आहे.
कामाचे स्वीकारले आव्हान…!

25 फूट शिवमूर्ती घडविण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. शिवमूर्ती घडविताना कोठेही इतिहासाला तडा जाणार नाही, याची खबरदारी आम्ही घेत होतो. पंचधातूची शिवमूर्ती घडविण्यात येत असून यासाठी लागणारे मातीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यापुढील काळात मोल्ड तयार करून कास्टिंग केले जाणार आहे. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात शिवमूर्तीची कुदनूर गावामध्ये प्रतिष्ठापना केली जाईल.
– विनायक मनोहर पाटील (मूर्तिकार)









