भांदूर गल्ली येथील रस्त्याच्या अर्धवट कामाचा वाहनांना फटका
प्रतिनिधी /बेळगाव
भांदूर गल्ली परिसरातील रस्त्याच्या विकासासाठी काम हाती घेण्यात आल्याने रहिवाशांची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी खोदून ठेवण्यात आलेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. मंगळवारी सकाळी मालवाहतूक करणारा टेम्पो रस्त्यावर अडकला. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला.
परिसरातील नागरिक आणि रिक्षाचालकांच्या मदतीने टेम्पो बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण खोदण्यात आलेल्या चरीमध्ये वाहनांची चाके रूतल्याने वाहन निघता निघेना. अखेर नागरिक वाहन तसेच ठेवून निघून गेले. त्यामुळे वाहनचालकाला गाडीतील साहित्य बाजूला उतरवून गाडी बाहेर काढावी लागली. डेनेजवाहिन्या व गॅसवाहिन्या घालण्याचे कारण सांगून सध्या शहरात सर्वत्र खोदाई सत्र सुरू आहे. भांदुर गल्ली परिसरात डेनेजवाहिन्या घालण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. तसेच रस्त्याचे कामदेखील सुरू करण्यात आले. पण पावसाला सुरुवात झाली तरी हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट रखडले आहे. यामधून ये-जा करताना वाहने अडकून पडत आहेत. रहिवाशांना आपली वाहने हेमुकलानी चौकात थांबवून घरी जावे लागत आहे. वाहनधारक, वृद्ध आणि शाळकरी मुलांना रस्त्यावरून जाणे मुश्कील बनले आहे. येथील रस्त्याचे काम दोन महिन्यांपासून सुरू असून कधी पूर्ण होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
येथील गटारीचे बांधकाम सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. पण हे काम देखील निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने सळय़ा बाहेर पडल्या आहेत. रस्त्यावर दगड टाकण्यात आल्याने नागरिक रस्त्याशेजारून ये-जा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण या ठिकाणी गटारीवरील उघडय़ा सळय़ांची अडचण निर्माण झाली आहे. ये-जा करताना पादचारी चुकून पडल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. गटारीची खोली कमी असल्याने सांडपाण्याचा निचरा देखील व्यवस्थित होत नाही. येथील समस्यांकडे महापालिकेच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. या समस्यांबाबत सातत्याने तक्रारी करूनही याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे वाहने अडकण्याचे प्रकार सुरू आहेत. मनपाच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.









