बिणगा येथे कारवार पोलिसांची कारवाई : एकजण ताब्यात
प्रतिनिधी /कारवार
कारवार-अंकोलामार्गे हैदराबादला चोरटी वाहतूक करण्यात येत असलेली गोवा बनावटीची सुमारे 26 लाख रुपये किमतीची दारू सोमवारी जप्त करण्यात आली. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई कारवार पोलिसांकडून कारवार ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिणगा येथील टपाल कार्यालयाजवळ करण्यात आली.
ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सुधाकर अर्जुन गोलांडे (रा. पिंपळेवाडी, महाराष्ट्र) असे आहे. गोव्याहून कारवार-अंकोलामार्गे हैदराबादकडे निघालेल्या कंटेनरची कारवार पोलिसांनी येथून जवळच असलेल्या बिणगा येथे तपासणी केली असता कंटेनरमध्ये 814 बॉक्समध्ये गोवा बनावटीच्या 30 हजार 212 दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या दारूची किंमत 26 लाख 29 हजार 536 रुपये इतकी असून दारूची वाहतूक हैदराबादकडे करण्यात येत होती, असे सांगण्यात आले.
सदर कारवाई कारवार पोलीस उपनिरीक्षक प्रेमनगौडा पाटील तसेच त्यांचे सहकारी राघवेंद्र नाईक, भगवान गावकर, संतोषकुमार के. बी. आदींनी केली.
वेगवेगळे तर्कवितर्क
कंटेनर कारवारच्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी कर्नाटक गोवा सीमेवरील माजाळी येथे दोन तपासणी नाके आहेत. एक कर्नाटक सरकारचा आणि दुसरा गोवा सरकारचा (पोळे). दोन तपासणी नाके असतानाही एवढय़ा मोठय़ा प्रमाणात चोरटी वाहतूक होत असतानाही संबंधितांच्या लक्षात कसे काय आले नाही. याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. कारवार पोलीस अधिक तपास करीत आहेत.