प्रतिनिधी /वास्को
झुआरीनगर येथील एम.ई.एस. उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली.
प्रमुख वक्ते मडगाव येथील सनशाईन हॉस्पिटलचे संचालक डॉ. सूरज प्रभुदेसाई यांनी पालकत्वातील बारकावे व कौशल्य विषयावर मार्गदर्शन केले. तरूणांच्या सर्वांगिण विकासासाठी पालकांनी सहकार्य करावे आणि पालक त्यांच्यासाठी आदर्श असावेत असे ते म्हणाले.
एम.ई.एस.च्या व्यवस्थापक नेली रॉड्रिग्स यांच्याहस्ते माजी पालक शिक्षक संघाच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कला, विज्ञान, वाणिज्य व व्यावसायीक शाखेतील प्रथम क्रमांक पटावलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी प्राचार्य विश्वनाथ स्वार यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रमुख वक्ते डॉ. सूरज प्रभुदेसाई यांचा परिचय करून दिला. त्यांनी संस्थेच्या विज्ञान शाखेत मुरगांव तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या रोहन कृष्णा दास या विद्यार्थ्याविषयी माहिती दिली. पालक शिक्षक संघाच्या सहसचिव रूपा सांखोळकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त सादर केले. सचिव विद्या क्वाद्रोस यांनी पालक शिक्षक संघातर्फे गेल्या शैक्षणिक वर्षातील उपक्रमाविषयी माहिती दिली. खजिनदार नफिसा बेग यांनी वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी व्यवस्थापन प्रतिनिधी सिदालिया बोदाडे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश परेरा यांनी केले. पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सचिन ठाकूर यांनी आभार मानले.









