वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रीडा क्षेत्रातील अनुभवी आणि कुशल क्रीडा प्रशासक म्हणून ओळखले जाणारे नरिंदर बात्रा यांनी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटना व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती सदस्यपदाचाही त्याग केला आहे.
25 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे नरिंदर बात्रा यांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद तसेच हॉकी इंडियाचे आजीवन सदस्यपद सोडावे लागले. बात्रा यांनी 2017 साली भारतीय ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक लढविली आणि ते पुन्हा निवडून आले होते. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालामुळे नरिंदर बात्रा यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटना, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती तसेच आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन या विविध संघटनांकडे आपला लेखी राजीनामा पाठविला आहे. काही वैयक्तिक समस्येमुळे आपण या पदाचा राजीनामा देत असल्याचे या पत्रामध्ये बात्रा यांनी म्हटले आहे.









