नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आर्मी टेनिंग कमांडचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (युपीएससी) सदस्य बनवण्यात आले आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सोमवारी ही माहिती दिली.
शुक्ला हे भारतीय लष्कराचे निवृत्त जनरल ऑफिसर आहेत. त्यांनी आर्मी टेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम केले आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी लष्करात योगदान दिले आहे. लेफ्टनंट जनरल शुक्ला हे उत्तर प्रदेशातील लखनौ येथील सैनिक स्कूल, पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि इंडियन मिलिटरी अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. याव्यतिरिक्त, त्यांनी संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालय आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयात उच्च संरक्षण व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत.
लष्करी सेवेतील विशेष योगदानाबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट सेवेबद्दल युद्ध सेवा पदक आणि सेना पदक देण्यात आले आहे. त्यांनी आर्टिलरी स्कूल आणि भूतानमधील भारतीय लष्करी प्रशिक्षण संघामध्ये शिकवण्याच्या नियुक्तींमध्ये देखील काम केले आहे.