अध्याय एकोणीसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, भागवतशास्त्र हे भक्तिप्रधान आहे. त्यातील निजभक्तीचे सार, हे माझे गुह्यातील गुह्य तुला मी सांगितले. सायुज्योत्तर भक्तितील, मेवा मोठय़ा आवडीने तुला मी दिला आहे. मी जसे सांगितले, त्याच रीतीने माझी श्रे÷ भक्ती आचरण करावी. असे म्हणत म्हणत श्रीकृष्णांनी उद्धवाला प्रेमाने उचलले आणि उद्धवाला हृदयाशी कवटाळून धरले. हृदयामध्ये हृदय एक होऊन गेले. या हृदयात होते ते त्या हृदयात घातले. उद्धवाच्या प्रेमाची देवाला इतकी आवड की, देवांनी त्याला हृदयाशी कवटाळले. भक्ताला प्रेमाने मारलेली मिठी सोडावयाचीही ते विसरून गेले. अशा प्रकारे आनंदाने व आवडीने दोघेही निष्काम प्रेमामध्ये बुडून गेले. उद्धव तर भक्तिसुखाच्या समृद्धीमध्ये बुडूनच गेला. कृष्णानी आपले सर्वस्व उद्धवाच्या हृदयात घातले परंतु ते उद्धवाला कळू मात्र दिले नाही. श्रीहरीचा हा एक मोठा चमत्कारच होता कारण उद्धवाला हे हृद्गत कळले असते तर उद्धव देवांशी एकरूप झाला असता. अशा परिस्थितीत पुढची सुरस कथा ते कुणाला सांगणार ? भगवंतांना श्रद्धावंत भक्तांशी बोलायला खूप आवडते पण श्रोताही तसाच तोलामोलाचा हवा, असा श्रध्दाशील श्रोता मिळणे कठीण असते. त्यामुळे भक्तिसुखाची थोरवी सांगताना त्यांची हौस पूर्ण होईल असा उद्धवाइतका प्रिय श्रोता आणावा कोठून ? या विचाराने भगवंतांनी उद्धवाला त्यांच्याशी ऐक्मय साधू दिले नाही. सूर्यापासून किरण फाकतात त्याप्रमाणे त्यांनी उद्धवाला मारलेली मिठी अगदी नाईलाजाने सोडवली. मिठीतून सुटल्यामुळे नुसते दिसण्यापूरते कृष्ण व उद्धव हे भिन्न भिन्न झाले तरी पण त्यांची अभिन्नता कांही मोडली नाही आणि मोडणार तरी कशी कारण मुळातच ते एकरूपच होते. म्हणजेच भगवंत आणि उद्धव हे वेगवेगळे आहेत असे म्हणणे म्हणजे पाण्यात काठी मारण्याचा प्रकार होय. पाण्यात कितीही वेळा काठी मारली तरी पाणी कधीच दुभंगत नाही. भगवंत पुढे म्हणाले, धर्माचे अशा प्रकारे पालन करण्याने चित्तामध्ये सत्त्वगुणाची वृद्धी होते आणि ते शांत होऊन आत्मचिंतन करू लागते. त्यावेळी भक्ताला धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य स्वतःहून प्राप्त होते. भक्ताने आपले अंतःकरण मला अर्पण केले असता, भक्त उत्साहित होऊन माझी भक्ती करू लागतो आणि त्यात दिवसेंदिवस वाढच होत जाते. आता मन माझ्या स्वरूपात ज्याला अर्पण करायचं आहे त्यासाठी एक सोपी युक्ती म्हणजे त्यानं माझं नामस्मरण करावं.
माझे नामस्मरण केले असता त्याच्या पातकांचा नाश होतो. भक्त मनात काही इच्छा धरून किंवा निरिच्छपणे नामस्मरण करतात. मनात काही इच्छा धरून नामस्मरण केले असता ते नामच सर्व कामना पूर्ण करते आणि निरिच्छपणाने नामस्मरण केले असता सर्व पातकांचे भस्म होते. पाप भस्म होण्याचा परिणाम म्हणजे रज आणि तम यांना जिंकून आपोआप धर्मपरायण व धार्मिक असा सत्त्वगुण वाढिला लागतो. वाढलेल्या सत्वगुणाच्या योगाने वैराग्याचे कायमचे ठाणे बसते. वैराग्याच्यायोगाने विषय निर्दालन होते आणि आत्मज्ञान प्रगट होते. विवेकासह वर्तमान ज्ञान वाढले म्हणजे स्वरूपाचे अनुसंधान लागते आणि शांतीचे समाधान वाढत जाते त्या वेळी मन मदर्पण होते. मन माझ्या ठिकाणी अर्पण झाले म्हणजे निजभक्ती प्रगट होते. निजभक्ती पूर्णपणे प्राप्त झाली की, भक्ताने न मागताच अष्टमहासिद्धि आपण होऊन त्याच्या अंगणात येऊन उभ्या राहतात. त्या सिद्धींकडे जो कधी ढुंकूनसुद्धा पाहात नाही, त्याला अप्राप्य अशी वस्तु कोणती राहते? माझ्या भक्तांचे माझ्याशी ऐक्मय झाल्यामुळे त्यांना माझी सारी सत्ता प्राप्त होते. अशी माझी भक्ती न जोडता व आत्मस्थिती न लाभता विषयासक्तीने वागू लागल्यास मोठा अनर्थ कोसळतो. मन जेव्हा मिथ्या प्रपंचात रमून इंद्रियांसह इकडेतिकडे भरकटू लागते, तेव्हा ते चित्त रजोगुणाने व्यापून नश्वर विषयात गुंतते तेव्हा त्याची स्थिती वरील स्थितीच्या उलट होते.
क्रमशः







