युक्रेनच्या अध्यक्षांनी घेतला निर्णय ः दोघांवरही रशियाची पाठराखण केल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ कीव्ह
24 फेब्रुवारी रोजी सुरू झालेले रशिया आणि युक्रेनमधील युद्ध 5 महिन्यांपासून सुरू आहे. परंतु हे युद्ध थांबविण्यासाठी अद्याप कुठलाच तोडगा निघालेला नाही. याचदरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी गुप्तचर तसेच सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख आणि प्रॉसिक्युटर जनरलची पदावरून हकालपट्टी केली आहे.
सुरक्षा प्रमुख इवान बाकानोव्ह आणि प्रॉसिक्युटर जनरल इरीना वेनेडिक्टोवा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दोन्ही अधिकाऱयांवर रशियाला साथ देण्याचा आरोप झाला होता. प्रॉसिक्युटर जनरल कार्यालय तसेच अन्य कायदा-अंमलबजावणी यंत्रणांच्या कर्मचाऱयांची देशविरोधी कृत्ये तसेच रशियाला साथ देण्याप्रकरणी आतापर्यंत 651 गुन्हे नोंद करण्यात आल्याची माहिती झेलेंस्की यांनी दिली आहे.
353 मुलांचा मृत्यू
रशिया सातत्याने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. रशियाच्या हल्ल्यांमुळे आतापर्यंत 353 मुलांना जीव गमवावा लागला आहे. तर 662 मुले जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वाधिक मुलांचा मृत्यू डोनेट्स्क क्षेत्रात झाला असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले आहे.
रशियाचीही मोठी हानी
युक्रेन देखील रशियाच्या कारवाईला चोख प्रत्युत्तर देत आहे. मागील 24 तासांमध्ये युक्रेनने रशियाचे 160 हून अधिक सैनिक ठार केले आहेत. 17 जुलैपर्यंत युक्रेनने रशियाच्या सुमारे 38,300 सैनिकांना ठार केले आहे. युक्रेनच्या सशस्त्र दलांनी रशियाचे 1,684 रणगाडे, 3,879 चिलखती वाहने, 846 तोफा, 248 अँटी-एअरक्राफ्ट गन, 110 हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट केल्या आहेत. तसेच 220 लढाऊ विमाने, 188 हेलिकॉप्टर्स, 688 युएव्ही, 166 क्रूज क्षेपणास्त्रs, 15 युद्धनौका उद्ध्वस्त करण्यास युक्रेनने यश मिळविले आहे.